मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचे आवाहन
पुणे : महावितरणमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना वीज वितरण यंत्रणेच्या तांत्रिक कामांसह उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्याचे कौशल्य आत्मसात करा. कौशल्यावर आधारित क्षेत्रात काम करताना हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त ठरेल असे मत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये अप्रेंटिस म्हणून नुकतीच २४ जणांची एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यात आली. विद्युत अभियांत्रिकीची पदवी व पदविका उत्तीर्ण असलेल्या या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मुख्य अभियंता पवार म्हणाले की, तांत्रिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यासाठी व्यावहारिक ज्ञान अतिशय महत्वाचे आहे. वीजक्षेत्रामध्ये ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरण सारख्या सार्वजनिक कंपनीमध्ये वर्षभर प्रशिक्षण मिळणार आहे. प्रत्येकाचे तांत्रिक कौशल्य विकसित करण्याचा प्रशिक्षणातून प्रयत्न करण्यात येतील.
तसेच अप्रेंटिस म्हणून भरती प्रक्रियेत प्राधान्य देखील मिळणार आहे. त्यामुळे वर्षभराच्या या प्रशिक्षणातून तांत्रिक कामाचे आणि तत्पर ग्राहकसेवेचे कौशल्य आत्मसात करा असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) ज्ञानदा निलेकर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब हळनोर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे अशा उमेदवारांना अप्रेंटिस म्हणून निवडीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये विद्युत अभियांत्रिकी पदवी व पदविका उत्तीर्ण असलेल्या २४ जणांची निवड करण्यात आली असून वर्षभरासाठी हे प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत. त्यांना सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
0 Comments