आशा वर्कर्स-गटप्रवर्तकांचे आझाद मैदानावर जागतिक महिलादिनी जोरदार आंदोलन

 मानधनात दीड हजार वाढीचा शासनाला प्रस्ताव दिल्याची अधिकाऱ्यांची माहिती



मुंबई : राज्यभरात सामान्य नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात महत्वाचे काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी जागतिक महिला दिनी मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र निदर्शने केली व आपल्या मागण्या जोरदारपणे सरकार दरबारी मांडल्या. या आंदोलनात राज्यभरातून हजारो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाच्या शेवटी राज्याच्या आरोग्य संचालकांनी आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनात दीड हजाराची वाढ शासनास प्रस्तावित केल्याचे सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत सन २००५ पासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे, महिलांना गरोदरपणात तसेच प्रसूतीदरम्यान मार्गदर्शन व औषधोपचार देणे तथा विविध प्रकारची आरोग्याची कामे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक करीत असतात. परंतु या सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अत्यल्प मानधनावर राबवून घेतले जाते. तसेच त्यांना विविध प्रकारच्या समाजिक सुरक्षा व सुविधा दिल्या जात नाहीत. याविरोधात त्यांचा लढा सातत्याने सुरू असतो. 

आपल्या या लढ्याला आणखी तीव्र स्वरूप देण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिनी आझाद मैदानावर हे आंदोलन आयोजित करण्यात आलेल. या आंदोलनात सीआयटीयू आणि आयटक प्रणित आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या.

बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा...

    


या आंदोलनाला सीटू प्रणित आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राज्य अध्यक्ष आनंदी अवघडे, उपाध्यक्ष शीला ठाकूर, राज्य सहसचिव संध्या पाटील यांच्यासह एम. ए. पाटील, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, राजू देसले, रंजना गारोळे, स्वाती धायगुडे, उज्ज्वला पडलवार यांनी मार्गदर्शन केले. 

या वेळी उपस्थित सर्व नेत्यांनी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्याचे व सरकार दरबारी आपल्या मागण्या जोरकसपणे मांडण्याचे आवाहन केले. ५ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. 


मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आरोग्य सहसंचालक पी. एम. पाडवी, आशा कार्यक्रम अधिकारी स्वाती पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन दीड हजार रुपये मानधन वाढवण्याची शिफारस शासनाला केली असल्याचे सांगितले. त्यावर कृती समितीच्या नेत्यांनी ही वाढ तुटपुंजी असून, त्यात वाढ करण्याची मागणी या अधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान यानिमित्ताने जमलेल्या आंदोलनकर्त्या महिलांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यांच्या घोषणांनी संपूर्ण आझाद मैदान अक्षरशः दणाणून गेले होते. आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या. 

या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील, रावेरचे आमदार शिरीष चौधरी, पुरंदरचे आमदार संजय जगताप, देवानंद पवार यांनी आपला पाठिंबा घोषित केला. 

Post a Comment

0 Comments