सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे २४ ते २६ मार्च दरम्यान

खादी संकल्पनेवरील ११ व्या 'स्पार्क २०२३' वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची पत्रकार परिषदेत माहिती


पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे (एसआयएफटी) खादी संकल्पनेवर आधारित 'स्पार्क २०२३' या हस्तकला प्रदर्शनाचे दि. २४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. 'सूर्यदत्त'च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी खादी पासून बनवलेल्या विविध २१०० प्रकारच्या कलात्मक उत्पादनांचे सादरीकरण होणार आहे. 

येत्या शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले असणार आहे, अशी माहिती 'सूर्यदत्त'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी 'सूर्यदत्त'च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा संजय चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, संचालिका प्रा. केतकी बापट, 'एसआयएफटी'च्या विभागप्रमुख प्रा. पूजा विश्वकर्मा, प्रा प्रियांका कामठे उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, "फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत बनवलेल्या नाविन्यपूर्ण वस्तूंच्या प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने खादीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने खादीवरील प्रदर्शन गेल्या दोन वर्षांपासून आयोजिले जात आहे. यंदा भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, तर सूर्यदत्त ग्रुप रौप्य महोत्सव साजरा करत आहे.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी खादीचा वापर करून २१ दिवसांत २१०० उत्पादने तयार केली आहेत. 'सूर्यदत्त'ने हाती घेतलेला हा एक आगळावेगळा स्टार्टअप आणि आत्मनिर्भर भारताकडे घेऊन जाणारा उपक्रम आहे. या उपक्रमाची नोंद अनेक वर्ल्ड रेकॉर्ड संस्थांनी घेतली आहे. कदाचित भारतामध्ये अशा स्वरूपाचे हे पहिलेच प्रदर्शन असेल. 

पर्यावरणपूरक नैसर्गिक तंतूंपासून, खादीचा उपयोग करून ही उत्पादने बनवण्यात आली आहेत. 'सूर्यदत्त' संस्था नियमितपणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यासाठी, भविष्यातील उद्योग व रोजगार निर्मितीसाठी सूर्यदत्त स्टार्टअप व्हेंचर अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात हातभार लावत आहे."

"आपल्यामध्ये खादीबद्दल आत्मीयता असेल, तर आपले जीवन सर्वार्थाने सहजपणे जगू शकतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगण्यातील साधेपणाचा मंत्र देताना 'खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन' असे सांगितले. त्यामुळे 'सूर्यदत्त'मध्ये विद्यार्थ्यांना खादीचे महत्व पटवून दिले जाते.

खादी आपल्यामध्ये मानवता, सहनशीलता, विश्वास आणि सहभावना विकसित करते. तसेच खादी विणकरांचे जीवन विद्यार्थ्यांना समजून घेता येते. खादीला देशाचा राष्ट्राभिमान करण्यासाठी फॅशन डिझाईनचे १८ ते २० वयोगटातील ग्रामीण भागातून, आदिवासी भागातून आलेले विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.

खादीपासून शक्य ते सर्व प्रकारचे उत्पादन बनवण्यावर त्यांनी भर दिला आहे. बॅग्ज, ऍक्सेसरीज, कपडे, लाइफस्टाइल उत्पादने, भेटवस्तू अशा २१०० उत्पादनांची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे," प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.

देशभरात तसेच जागतिक स्तरावर खादीच्या कपड्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने हाताने तयार केलेल्या आणि हाताने विणलेल्या कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्तानी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांनी या वस्तू बनवताना पर्यावरणपूरकतेलाही प्राधान्य दिले आहे. अनेक छोट्या तुकड्याचा पुनर्वापर करून लक्षवेधक वस्तू बनवल्या आहेत." खादी हे फक्त कापड नसून, तो एक विचार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हा विचार आपल्या आचरणात आणावा. खादीमधील सूताप्रमाणे पर्यावरण, व्यवस्था आणि समाजातील धागे विणून राष्ट्राची बांधणी करण्यात युवकांनी योगदान द्यावे, हा या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments