महा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यातील ५१ एनजीओंना मदतीचा हात
पुणे : कोविडसारख्या संकटाच्या काळात संपूर्ण जग हबकले, मात्र आपला देश ताठ मानेने उभा राहिला. मंदीच्या काळात देखील देश तग धरुन होता. राजकारणी मंडळी येतात आणि जातात, त्यांचे तसेच ठिक असते. असे असले तरी देखील जीवनमूल्यांचे महत्व देश कधीच विसरला नाही.
जीवनमूल्य टिकविण्यातच राष्ट्राचे हित असून सरकारविरहित सेवाव्रतींचा ओलावा हाच खरा धर्म आहे, असे मत अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू.स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
महा एनजीओ फेडरेशनतर्फे विविध महा सेवा संकल्पांतर्गत विविध उपक्रमांचा शुभारंभ सोहळा मुकुंदनगरमधील झांबरे पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या ५१ वर्षे पूर्तीचे औचित्य साधून हे प्रकल्प सुरु करण्यात आले.
फलटण येथील महा एनजीओ फेडरेशनच्या गोशाळेचे उद््घाटन, बुधवार पेठेतील महिलांना पोषण आहार वाटप, महाराष्ट्रातील ५१ एनजीओ यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या उपयुक्त वस्तू, ग्रंथतुलेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट अशा विविध सेवा प्रकल्पांचा शुभारंभ व प्रत्यक्ष वाटप देखील यावेळी झाले.
या वेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तळागाळात काम करणारे अनेक कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. गरजू व पिडीतांचे आयुष्य व घर वसविण्याचे काम ते करीत आहेत. प्रत्येक घटकासाठी प्रत्येक पाऊलावर मदत करणा-या संस्था राज्यात असून त्यांची मूठ महा एनजीओ फेडरेशन व शेखर मुंदडा यांनी बांधली आहे.
शेखर मुंदडा यांनी देखील मनोगत व्यक्त केले. महा एनजीओ फेडरेशन कार्यकारी संचालक ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या कामाची विस्तृत माहिती देत समाज सेवकडे लोकांचा ओढा जावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले . कार्यक्रमासाठी महा एनजीओ फेडरेशन संचालक समिती व शेखर मुंदडा यांच्या परिवाराने विशेष मेहनत घेतली.
0 Comments