रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड तर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराचे वितरण
पुणे : "समाजातील दुर्बल व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सेवाभावी वृत्तीने काही माणसे करीत असतात; पण अशा लोकांची अनेकदा दखल घेतली जात नाही. त्यांचा यथोचित सन्मान केला आणि ज्यांच्यासाठी सेवाभावी काम केले जाते, त्यांनी हे काम पुढे नेले, त्यातून सामाजिक दायित्वाच्या भावनेने काम करणारे सेवावृत्ती वाढल्यास समाज उन्नत होईल," असे प्रतिपादन रोटरी क्लब इंटरनॅशनलच्या माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या वतीने आयोजित 'व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार' आणि 'रोटरी मिञ पुरस्कार' वितरण समारंभात रश्मी कुलकर्णी बोलत होत्या.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे अध्यक्ष उज्वल केले, सचिव राधा गोखले, पंडित विजय कोपरकर, 'सा' संस्थेचे अध्यक्ष अभय केले, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात लाईफ ट्रान्सफॉर्मर्स संस्थेच्या संस्थापिका प्रा. डॉ. स्मिता सोहनी, स्क्रिझोफेनिक अवेअरनेस असोसिएशन संस्थेच्या उपाध्यक्षा नीता कोपरकर यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने आणि विद्यार्थी सहायक समितीच्या विश्वस्त सुप्रिया केळवकर यांना रोटरी मिञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र आणि पैठणी साडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रश्मी कुलकर्णी म्हणाल्या, 'गुणवत्ता आणि श्रमाला मूल्य असते. समाजात अशी काही कामे असतात, ज्याचे मूल्य पैशात करता येत नाही. समाजात महिलांचे विविध पैलू पहावयास मिळतात. महिलांनी स्वतःच्या अंतर्मनाचा वेध घेतला तर विविध क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतात. ही ताकद त्यांच्यात आहे. माञ आळशीपणा आणि सकारात्मकतेचा अभाव हे अनेक महिलांच्या प्रगतीसाठी अडसर बनत आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी कलागुणांची जोपासना करणे गरजेचे आहे."
स्वागत प्रास्ताविक उज्ज्वल केले यांनी केले. सूत्रसंचालन सुनेत्रा मंकणी यांनी केले. मानपत्राचे वाचन मिनल ओरपे यांनी केले. आभार सुधीर बापट यांनी मानले.
0 Comments