सिंधी तरुणांकडून एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीनची देणगी
पुणे : पिंपरी योद्धाजने गुरुनानक नाईट्सचा ५६ धावांनी पराभव करीत 'सिंधी प्रीमियर लीग सीझन ४'चे विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरी करणारा जितू वालेचा सामनावीर, तर संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करणारा मयूर ललवाणी स्पर्धेचा मानकरी ठरला. पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर २४ दिवस ही स्पर्धा झाली. नाणेफेक जिंकून गुरुनानक नाईट्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटच्या धर्तीवर दोन डावांचा हा सामना झाला. प्रत्येक डावात ९ षटके खेळण्यात आली.
पिंपरी योद्धाजने पहिल्या डावात ९ षटकात ६ गडी गमावत ७५ धावा करून गुरुनानक नाइट्सला ४९ धावांवर रोखत निर्णायक २६ धावांची आघाडी घेतली. या आघाडीसह पिंपरी योद्धाजने दुसऱ्या डावात ९ षटकांत ८ बाद ८१ अशी धावसंख्या उभारली. जितू वालेचाने २१, तर मनीष कटारियाने १६ धावा केल्या. महेश तेजवानीने ४ धावांत २, तर पंकज रामवाणीने ५ धावांत २ गडी बाद केले.
दुसऱ्या डावात विजयासाठी ८२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गुरुनानक नाईट्सची सुरुवात अडखळत झाली. एकही खेळाडूला दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. योद्धाजच्या भेदक गोलंदाजीसमोर नाईट्सचा संघ अवघ्या २५ धावांत गुंडाळला गेला. योद्धाजच्या कुणाल गुडेलाने १२ धावांत ३, मनीष कटारियाने ५ धावांत २, तर मयूर ललवाणीने ८ धावांत २ गडी बाद केले.
सिंधी तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून 'सिंधी प्रीमिअर लीग'चे आयोजन केले जाते. यंदा लीगमधून उभारलेल्या निधीतून एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीनची देणगी देण्यात आल्याचे संयोजक हितेश दादलानी व कन्वल खियानी यांनी सांगितले. रॉकस्टार नील यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि सिंधी समाजाच्या स्नेहमेळाव्याने स्पर्धेची सांगता झाली.
-------------------------
संक्षिप्त धावफलक :
पिंपरी योद्धाज : पहिला डाव - ६ बाद ७५, गुरुनानक नाईट्स : पहिला डाव - ६ बाद ४९.
पिंपरी योद्धाज : दुसरा डाव - ९ षटकांत सर्वबाद ८१ (जितू वालेचा २१, मनीष कटारिया १६, महेश तेजवानी ४-२, पंकज रामवाणी ५-२) विजयी विरुद्ध गुरुनानक नाईट्स : दुसरा डाव - ५.४ षटकांत सर्वबाद २५ (महेश तेजवानी ७, पंकज रामवाणी ६, कुणाल गुडेला १२-३, मनीष कटारिया ५-२, मयूर ललवाणी ८-२)
0 Comments