बौद्धिकदृष्ट्या असक्षम मुलांसाठी विशेष बागेची उभारणी

बागेत विशेष मुलांना मिळणार पंचज्ञानांची अनुभूती, `उमेद`चा अनोखा उपक्रम


पुणे : बौद्धिकदृष्ट्या असक्षम असणारी विशेष मुले, व्यक्ती यांना अनेकदा आवाज, दृश्य, गंध, चव आणि स्पर्श अशा पाच ज्ञानांची अनुभूती घेताना अडचणीचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेत, विशेष मुले, व्यक्ती यांच्यामध्ये पंचज्ञानांची जाणीव वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने पुण्यातील उमेद परिवार या सामाजिक संघटनेतर्फे हडपसरपासून १५ किमी अंतरावरील वडकी गाव येथे एका विशेष बागेची उभारणी करण्यात आली आहे.


या विशेष बागेचे नुकतेच रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे प्रांतपाल अनिल परमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. याप्रसंगी रोटेरियन मोहन पालेशा, संतोष मराठे, उमेद परिवाराचे अध्यक्ष रमेश वांद्रे, सचिव राजेंद्र नहार, विश्वस्त सुभाष रावल, प्रविण छाजेड हे उपस्थित होते.  


या विशेष बागेबाबत माहिती देताना राजेंद्र नहार म्हणाले, “बौद्धिकदृष्ट्या असक्षम असलेली मुले, व्यक्ती यांच्यामध्ये जाणीव क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने आम्ही या बागेची निर्मिती केली आहे. यासाठी टाटा ब्ल्यूस्कोप लिमिटेड, पुणे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. बागेच्या रचनाकार आर्किटेक्ट स्नेहल ओसवाल या आहेत. या बागेत सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत ही बाग खुली राहणार आहे. ’’



या बागेमध्ये आवाज,दृश्य,गंध,चव आणि स्पर्श यांच्या अनुषंगाने आम्ही विविध घटकांचा समावेश केला आहे. विशेष व्यक्तींना आवाजाची ओळख व्हावी, यासाठी विविध प्रकारच्या घंटा बागेत लावण्यात आल्या आहेत. त्यांचा गंधाची जाणीव व्हावी यासाठी विविध प्रकारची फुलझाडे तर चवीच्या जाणीवेसाठी तुळस, कडूनिंब यांसारखी औषधी झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांच्या पानाद्वारे ते विविध चवींची अनुभूती घेऊ शकतील.


त्याचबरोबर स्पर्श हा घटक लक्षात घेत, बागेत आम्ही विविध प्रकारच्या फरशांचा समावेश केला आहे. त्यामुळे खडतर, थंड, गुळगुळीत असे विविध स्पर्श समजण्यास त्यांना मदत होईल. तर दृष्टी या घटकाच्या अनुषंगाने आम्ही बागेमध्ये फायबर’च्या काही शीट लावल्या आहेत. ज्याद्वारे प्रकाश परावर्तित होऊन रंगांच्या विविध छटा त्यावर दिसतील, असेही नहार यांनी सांगितले.             


उमेद परिवाराबाबत - बौद्धिकदृष्ट्या असक्षम असलेल्या विशेष मुलांच्या पुर्नवसनासाठी गेली ३२ वर्षे कार्यरत असलेल्या या संघटनेची स्थापना १९९० साली झाली होती. संघटनेतर्फे द्विवार्षिक राज्यस्तरीय परिषद, विशेष मुलांच्या शाळेत दरवर्षी राज्यस्तरीय चित्रकला, नृत्य, नाटक स्पर्धांचे आयोजन केले जाते. वडकी गाव येथे बौद्धिकदृष्ट्या असक्षम असलेल्या व्यक्तींसाठी एक हॉस्टेलदेखील संस्थेतर्फे चालविले जाते. याठिकाणी सध्या ३५ जण राहत आहेत.


Post a Comment

0 Comments