देवराईमध्ये आढळले मंदिराचे अवशेष आणि मोडी लिपीतील भग्न अवस्थेतील लेख
पुणे : टिळक चौकातील श्री लकडीपूल विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस देवराईमध्ये वृक्षारोपण करताना शिवकालीन काळभैरवनाथ मंदिराचे अवशेष सापडले. त्यामध्ये मोडी लिपीतील भग्न झालेल्या अवस्थेतील लेख आढळून आला. १९६१ सालच्या पुरात मंदिराचे खूप नुकसान झाले व श्री काळभैरवनाथ मंदिर वाहून गेले. त्याच मंदिराचे अवशेष सापडल्याने श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर देवस्थानच्या वतीने मंदिराचा जिर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्योध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, ज्येष्ठ सदस्य रमेश मणियार यावेळी उपस्थित होते.
दिपक थोरात म्हणाले, श्री लकडीपूल विठ्ठल मंदिराच्या देवराईमध्ये मंदिराचे अवशेष सापडले. त्यामध्ये मोडी लिपीतील भग्न झालेल्या अवस्थेत लेख आढळून आले. त्यावरुन लक्षात आले की पूर्वी येथे काळभैरवाचे मंदिर होते,त्याचा जिर्णोद्धार मंदिराचे संस्थापक अध्यक्ष शंकर रामभाऊ थोरात यांनी केला होता.
त्याचप्रमाणे पेशव्यांनी मंदिरामागील घाटाची बांधणी केली व दर रविवारी आरतीचे आयोजन केले. दर रविवारी आरती व्हायची, लोक गर्दी करायचे. घंटा, डमरु यांचा मनमोहक आवाज यायचा. इथून जवळच स्मशानभूमी असल्याने लोक भूत पिशाच्च्यांवर उपचार करण्याच्या हेतूने येथे उपस्थित रहायचे.
अशा स्वरूपाचा महिमा असलेले हे मंदिराची आज परत त्याच थाटात उभारणी करण्यात आली. श्री काळभैरवनाथ मंदिराचे व मुर्तीचे काम ज्येष्ठ शिल्पकार प्रसाद चंद्रकांत परब यांनी केले आहे.
0 Comments