छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर एक विचार आहे : अमित शाह

नऱ्हे - आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 

‘सरकारवाडा'चे लोकार्पण शाह यांच्या हस्ते


पुणे : "छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन हे अत्याचाराविरोधात विद्रोह करण्याचे, स्वधर्मासाठी संघर्ष करण्याचे, स्वराज्य स्थापित करण्याचे होते. राज्याचा उद्देश हा लोककल्याणसाठी आहे, हा संदेश त्यांनी आपल्या मुद्रेद्वारे दिला आहे. उत्तम शासक कसा असावा, याचे उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही, तर एक विचार आहे, " असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.


पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे नऱ्हे - आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ‘सरकारवाडा'चे लोकार्पण शाह यांच्या हस्ते झाले.


शिवजयंतीचे औचित्य साधत संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगाव, प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शाह यांनी सरकारवाडा'ला भेट देत, त्याबाबतची माहिती जाणून घेतली.


तसेच प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमात कदम यांनी शाल, कवड्यांची माळ, शिंदेशाही पगडी आणि स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार केला. शिवसृष्टीच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये गार्डियन मिडीया अँड एन्टरटेंमेंट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.  


यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांबद्दल बोलताना शाह म्हणाले, "शिवाजी महाराज स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठी आग्रही होते. त्यांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे त्यांच्या सुराज्याचा दृष्टिकोन दिसून येतो. त्यांनी चालू केलेला स्वराज्याचा संघर्ष आजही चालू आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आजचे सरकारदेखील मार्गक्रमण करत आहे. त्यांच्या या विचारांचा ठेवा येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहचविणाऱ्या शिवसृष्टीचे आज माझ्या हस्ते लोकार्पण होत आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे."


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल बोलताना शाह म्हणाले, "शिवशाहीर बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समर्पित केले. त्यांनी तसे केले नसते, तर कदाचित शिवरायांचे कार्य फार कमी लोकांपर्यंत पोहोचले असते.


जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग इतके प्रभावशाली होते, की लोक एक नाट्य रूपांतर बघण्यासाठी येत,मात्र घरी परतताना शिवरायांचे भक्त बनून जात. जगभरातून बाबासाहेबांनी शिवरायांशी निगडित अनेक दस्तऐवज मागवून शिवरायांचे जीवनचरित्र लिहले, आताच्या आणि येणाऱ्या पिढीसाठी हे अतिशय मोलाचे काम आहे.”


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराथ राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये ‘जाणताराजा’चे प्रयोग केले असताना मी स्वत: देखील या महानाट्याचा अनुभव घेतला आहे, अशी आठवण शाह यांनी सांगितली.        


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " महाराजांनी रयतेसाठी आपला जीव ओवाळून टाकला होता. अत्यंत कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेला आणि अत्यंत काळजीवाहू राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असा दुसरा राजा पूर्ण विश्वात झालेला नाही. त्याचबरोबर शिवरायांच्या इतिहाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक ठिकाणाला भेट देत, त्याचा सखोल अभ्यास करत, महाराजांचे कार्य, त्यांचे आदर्श असे शासन लोकांपर्यंत पोहचविण्याचे महान कार्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.


त्यांचे स्वप्न असलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम, हे आता आपल्या सर्वांचे आहे. त्यामुळे आता हे काम थांबणार नाही, ते अत्यंत वेगाने पुढे जाईल असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन त्यांना संपूर्ण सहकार्य करेल."


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " शिवजयंतीच्या पवित्र दिवशी शिवसृष्टीच्या पहिल्या टप्याचे आज लोकार्पण होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या ठिकाणी भेट दिल्यानंतर देशभरातील तरुण हे राष्ट्रप्रेमाचे शिवतेज येथून येथून जातील, असा मला विश्वास आहे. महाराजांचे केवळ क्षात्रतेज नव्हे, तर त्यांचे व्यवस्थापनशास्त्र, राज्यकारभाराची पद्धती, पर्यावरणविषयक विचार, नौदला संदर्भातील कार्य हे सर्वच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करणार आहे."


२०१४ साली ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले, त्यावेळी सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले, चिंतन केले आणि त्यानंतर देशभरात प्रचार कार्यास सुरवात केली, अशी आठवण फडणवीस यांनी यावेळी सांगितली. तसेच गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानतात. त्यांच्या जीवनावर त्यांनी सातत्याने संशोधन केले आहे.


जगभरात उपलब्ध असलेले मराठा साम्राज्यासंदर्भात विविध दस्तऐवज मिळवून छत्रपती शिवाजी महाराज यांवर ते स्वतः एक पुस्तक लिहीत असून, त्यासाठी त्यांनी लंडन येथून देखील काही सामग्री व दस्तऐवज भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लवकरच त्यांचे हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, अशी माहिती देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.


कार्यक्रमात प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी या प्रकल्प निर्मितीचा आतापर्यंत झालेला प्रवास याबाबत माहिती देत, याबरोबरच शिवराज्याभिषेकाला पुढील वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत असून याचे औचित्य साधात शिवसृष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचे कदम यांनी नमूद केले. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रतिष्ठान'चे विश्वस्त विनीत कुबेर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments