अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळा होणार
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात आगमन होत असून शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मंडईमधील श्री शारदा गजानन मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त पुढील ३ दिवस महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे आणि पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणूकीस प्रारंभ होईल. दरवर्षी प्रदान करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ पुरस्कार यंदा स्वामी भक्त बंडोपंत तिखे यांना देण्यात येणार आहे. मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
पालखी सोहळ्याचे यंदा २६ वे वर्ष आहे. रविवार, दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी आणि भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच सोमवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार असून दिवसभर रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
0 Comments