चांगुलपणाच्या बेरजेतूनच नात्याची वीण घट्ट होईल

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; संस्कृती प्रकाशनातर्फे 'नाती वांझ होताना'चे प्रकाशन


पुणे : "नात्यातील ओलावा कमी झाला की, नाती वांझ होतात आणि समाजातील दुरावा वाढत जातो. त्यातून विसंवाद, फसवणूक, क्रूरता जन्माला येते. अशा वेळी चांगुलपणाची बेरीज समाजाला एकसंध ठेवण्यासाठी गरजेची असते. नात्यांमधील वीण घट्ट करत ती फुलवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा," असे परखड मत ज्येष्ठ समीक्षक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.


संस्कृती प्रकाशनातर्फे मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या 'नाती वांझ होताना' कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. सबनीस बोलत होते. पत्रकार भवनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह कवी उद्धव कानडे, कवी प्रा. प्रदीप पाटील, डोंगरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष वसंत पाटील, प्रकाशिका सुनीताराजे पवार, कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर, पृथ्वीराज पाटील, सर्जेराव पाटील, मनीषा रायजादे आदी उपस्थित होते.


डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, "मनीषा पाटील यांच्या कविता ज्ञात आणि अज्ञात वास्तवाला भिडणाऱ्या आहेत. कोणत्याही वादात न अडकता समर्पित भावनेने आपल्या वेदना, संघर्ष, अनुभव त्यांनी मांडले आहेत. मने दूषित होत असल्याचा काळात त्यांच्या या कविता आशा पल्लवित करणाऱ्या आहेत. वेदना कालातीत असल्या, तरी जगण्यावर दुर्दम्य प्रेम करता यायला हवे, असा विचार यातून दिला आहे."


उद्धव कानडे म्हणाले, "स्त्रीच्या वेदनेशी एकरूप झालेली कविता असते. मानवाच्या अंतरंगाचा शोध घेणारी मनीषा पाटील यांची कविता असून, नात्यांच्या भावविश्वाचा आढावा त्यांनी घेतला आहे. पणतीच्या प्रकाशाप्रमाणे कविता समाजमन प्रकाशमान करण्याचे काम करते. स्त्रीचा होणारा कोंडमारा समर्थपणे मांडता आला पाहिजे. फाटलेल्या काळजातून येणारी कविता शाश्वत असते."


मनीषा पाटील म्हणाल्या, "मन व्यक्त करण्यासह भावनांचा निचरा होण्यासाठी कविता महत्वाची आहे. तंत्रयुगाने माणसाला एकटेपण दिले आहे. या एक्टेपनावर फुंकर घालून समविचारी माणसांना जोडण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहातून केला आहे."


प्रदीप पाटील यांनी कवी आपल्या कवितेतून जगण्याचा अन्वयार्थ लावत असल्याचे सांगितले. स्त्रीच्या वेदनेचे, जाणिवेचे टोकदार विवेचन मनीषा पाटील यांनी केले असून, त्यांची कविता कसदार आहे, असे वसंत पाटील यांनी नमूद केले.


सुनीताराजे पवार यांनी स्वागत प्रास्ताविक केले. रुपाली अवचारे यांनी सूत्रसंचालन केले. संजय ऐलवाड यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments