मंजुषा पाटील यांचे बहारदार गायन तर पं. नरेंद्र मिश्र यांच्या सतारवादनाने रंगला
‘श्रद्धा सुमन' कार्यक्रमाचा पहिला दिवस
पुणे : तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल संस्थेच्या वतीने आयोजित 'श्रध्दा सुमन' या विशेष सांगितीक कार्यक्रमात गायन वादनाद्वारे पं किशन महाराज यांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका मंजुषा पाटील यांचे गायन झाले यानंतर उस्ताद विलायत खान यांचे शिष्य आणि बनारस घराण्याचे प्रसिद्ध सतार वादक पं. नरेंद्र मिश्र यांचे सतारवादन रंगले. कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आज महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालिका सुनीता आसवले उपस्थित होत्या.
आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे दरवर्षी पं.अरविंद कुमार आझाद हे ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रम शृंखलेतील हा पाचवा कार्यक्रम असणार असून सदर तीन दिवसीय सांगीतिक कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विशेष सहकार्याने संपन्न होत आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संचालनालयाचे प्रधानसचिव श्री. विकास खारगे आणि संचालक श्री.विभीषण चौरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
आज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मंजुषा पाटील यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारवाने आपल्या गायनाला सुरुवात केली. मला इथे सेवा करायची संधी मिळतेय, पंडित किशन महाराज यांचा आशीर्वाद मिळतोय ही सौभाग्याची गोष्ट आहे, असे मंजुषा पाटील यांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी ' पिया मोरे अनत देस...'
ही विलंबित तीन तालातील रचना प्रस्तुत केली. यांनतर त्यांनी 'हो गुणीयन मिल गाओ बजाओ...' ही एकतालातील द्रुत बंदिश पेश केली. ' जबसे तुम्ही संग लागे...' या राग भूप मधील बंदिशीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.
त्यांना सौरभ गुळवणी (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), तनिष्क (स्वरसाथ) आणि शिरीन, शिवानी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
यानंतर पं. नरेंद्र मिश्र यांचे सतारवादन सादर झाले. त्यांनी राग पुरिया धनाश्रीने आपल्या वादनाला सुरुवात केली. त्यांच्या दमदार सतार वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या वादनाला उपस्थितांनीही टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विलंबित तालात आलाप जोड झाला ची बहारदार प्रस्तुती मिश्र यांनी केली. याबरोबरच
राग बसंत बहार मधील 'ऋतू बसंत आयो सखी...' ही रचना त्यांनी प्रस्तुत केली. यावेळी अनिरुद्ध देशपांडे यांनी समर्पक तबला साथ केली. गुरुभक्ती कशी निभवावी याचे उदाहरण पंडीत अरविंद कुमार आझाद यांनी आम्हा कलाकारांना घालून दिलेले आहे. आज मी महाराष्ट्रात कला सादर करायला आलो आहे ते केवळ त्यांच्या आग्रहास्तव असे मिश्र यांनी सांगितले.
सुनीता आसवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ सुनील देवधर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
0 Comments