मातृशक्तीचे सर्वोच्च शिखर म्हणजे राजमाता माँ जिजाऊ

इतिहास अभ्यासक विद्याचरण पुरंदरे यांचे मत; पोवाडयातून राजमाता जिजाऊंना अभिवादन 


पुणे : आज आपल्याला स्वराज्य मिळवायचे नाही, तर मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करायचे आहे. धर्मावर होणारी सांस्कृतिक आक्रमण रोखायची आहेत. जिजाऊ प्रमाणे आदर्श माता व्हायचे आहे. समाजाचा एक उत्तम नागरिक होणे आणि समाजाला सर्वोत्तम गोष्टी देणे हा आदर्श जिजाऊ यांच्याकडून घ्यायचा आहे.


त्यांनी समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात एक आदर्श राजा दिला आणि धर्माचे रक्षण करणारे धर्मवीर संभाजी महाराज दिले. असे महान पुरुष घडवणारी माता ही फक्त राजमाता नाही तर मातृशक्तीचे सर्वोच्च शिखर असणारी संस्कृतीचे जतन करणारी जननी आहे, असे मत इतिहास अभ्यासक विद्याचरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.


शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, स्वरूपवर्धिनी आणि अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ऐतिहासिक लालमहालात जिजाबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत पोवाडा सादरीकरण करण्यात आले.


यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या कार्याध्यक्षा  प्रा. संगीता मावळे, अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स च्या शिक्षिका विजयश्री महाडिक, आचार्य शाहिर हेमंतराजे मावळे, होनराज मावळे, अरुणकुमार बाभूळगावकर, ओंकार चिकणे यावेळी उपस्थित होते.


विद्याचरण पुरंदरे म्हणाले, आपल्यावर सांस्कृतिक आक्रमणे होत आहेत. जिजाऊंप्रमाणे धर्माचे रक्षण कसे करायचे याचा विचार करायला हवा. शिवाजी महाराजांचे चरित्र हे महाभारताइतकेच भव्य आहे आणि हे चरित्र घडविणाऱ्या महान मातेचा आदर्श घ्या, असेही त्यांनी सांगितले. 


संगीता मावळे म्हणाल्या, तुम्ही उद्याच्या जिजाऊ आहात. परंतु जिजाऊ होणे सोपे नाही. त्यासाठी खूप सामर्थ्य अंगी असावे लागते. आज आपण जिजाऊकडे आशीर्वाद मागूया.  संकटातून लढण्यासाठी मनगटात बळ देखील मागू, असे त्यांनी सांगितले.  अक्षदा इनामदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. प्रा. संगीता मावळे यांनी प्रास्ताविक केले.

Post a Comment

0 Comments