पुणेकरांना भावताहेत मेळघाट येथील आदिवासी बांधवांनी बनविलेल्या वस्तू

'बदलते मेळघाट ' प्रदर्शनास उत्साहात सुरुवात



पुणे : साडीपासून बनविलेली गोधडी, बांबूपासून बनविलेले टूथ ब्रश, घड्याळ, फळांची टोपली, दिवे  दैनंदिन अशा जीवनातील अनेक वस्तू तसेच विविध प्रकारचे आकर्षक दागिने अशा मेळघाट येथील कोरकू, पारधी, भिल्ल समाजातील आदिवासी कारागीर बांधवांनी बनविलेल्या वस्तू पुणेकरांना भावत आहेत. या वस्तूंबरोबरच आदिवासी बांधवांनी पिकविलेली सेंद्रिय धान्ये, मध या गोष्टी देखील एक विशेष आकर्षण ठरत आहेत.


अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आदिवासी कला व संस्कृती पुणेकरांसमोर यावी, आदिवासी बांधवांच्या जीवनाचे विविध पैलू शहरी नागरिकांसमोर उलगडावेत या उद्देशाने पुण्यातील मेळघाट सपोर्ट गृप आणि अमनोरा येस फाउंडेशन यांच्या वतीने  ‘बदलते मेळघाट’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


हडपसर येथील अमनोरा मॉलच्या वेस्ट ब्लॉक या ठिकाणी आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाले. यावेळी  डॉ. शैला वंजारवाडकर, संपूर्ण बांबू केंद्राच्या संचालिका निरुपमा देशपांडे, अमनोरा येस  फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, मेळघाट सपोर्ट ग्रुप'चे सदस्य संतोष नखाते हे उपस्थित होते.


वंजारवाडकर म्हणाले, " या प्रदर्शनात आदिवासी बंधूंनी बनविलेल्या अत्यंत सुंदर आणि कलात्मक वस्तू आहेत. या प्रदर्शनातून मेळघाट हा घरोघरी पोहचण्यास मदत मिळेल. भारताच्या विकासामध्ये, आत्मनिर्भरतेमध्ये या सगळ्या कलाकार बांधवांचा सन्मान व कलांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे.   तो या प्रदर्शनात होत आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे."


निरुपमा देशपांडे म्हणाल्या ," गेली २७ वर्षे आम्ही मेळघाट येथे हे काम करत आहे. सामान्यपणे मेळघाट म्हटले की, कुपोषित भाग असे चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर येतात. मात्र मेळघाट'चे हे चित्र बदलून, कला आणि उद्योगाचे केंद्र अशी नवी ओळख घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच यंदा प्रदर्शनात सहभागी करणारे कारागीर आणि कलाकार हे प्रथमच पुण्यात आपली कला सादर करत आहेत, त्यामुळे या प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे."


हे प्रदर्शन आदिवासी बांधवांना त्यांची कला व कौशल्ये सादर करण्यासाठी, व शहरी भागातील नागरिकांना आदिवासी कला व संस्कृती अनुभविण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे, असे मेळघाट सपोर्ट ग्रुप'चे मिलिंद लिमये यांनी सांगितले.


पारधी आणि आदिवासी समाजातील मुलांसाठी शाळा सुरू करणे,  घरकाम करणाऱ्या महिलांसाठी अवंतिका क्लब ची स्थापना करत, त्यामाध्यमातून पाणी बचतीचा संदेश देणे, आरोग्य शिबिराचे आयोजन, कौशल्य विकास प्रशिक्षण अशी विविध समाजोपयोगी कामे करणाऱ्या फाउंडेशन' ने या प्रदर्शनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. विशाल कुमावत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments