‘ऊर्जा’ महोत्सवात युवा कलाकारांचे दमदार सादरीकरण


पुणे : युवा कलाकारांचे दमदार व वैविध्यपूर्ण सादरीकरण हे उर्जा महोत्सवाचे खास आकर्षण ठरले. युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातील आवर्तन गुरुकुल, नील दीक्षित व कन्नडा संघ पुणेचे कावेरी कलाक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ऊर्जा या विशेष युवा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी श्रद्धा मुखडे व श्रेया कुलकर्णी यांचे कथक नृत्य, हेमंत जोशी यांचे एकल तबलावादन, डॉ. शंतनू गोखले यांचे संतूरवादन तर गंधार देशपांडे यांचे गायन रंगले. तालयोगी पद्मश्री पं सुरेश तळवलकर, गुरु पं रामदास पळसुले, नृत्यगुरु शमा भाटे, गोविंद बेडेकर, शारंगधर साठे, वर्षा परांजपे, शारंग नातू, विनय गरगटे, शिरीष कौलगुड, अनिता संजीव, श्रीकांत शिरोळकर आणि नील दीक्षित हे या वेळी उपस्थित होते.


कृष्णवंदनेने श्रद्धा मुखडे व श्रेया कुलकर्णी यांनी आपल्या कथक नृत्याला सुरुवात केली यानंतर त्यांनी झपताल, ‘बाजे मुरलीया बाजे...’ हे कृष्ण भजन व देस रागातील चतुरंग प्रस्तुत केला. त्यांना अमेय देशपांडे (तबला),


यशवंत थिट्टे (संवादिनी), अमीरा पाटणकर (पढंत) व शुभम खंडाळकर (गायन) यांनी साथसंगत  केली. यानंतर हेमंत जोशी यांनी एकल तबलावादन सादर केले. तीनतालाच्या बहारदार प्रस्तुतीने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांना यशवंत थिट्टे यांनी नगमा साथ केली.


यानंतर डॉ शंतनू गोखले यांनी संतूरच्या सुरावटींनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी राग रागेश्वरी सादर केला. पहाडी धूनचे सादरीकरण करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अजिंक्य जोशी यांनी समर्पक तबलासाथ केली. युवा गायक गंधार देशपांडे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप झाला. त्यांनी राग केदार व राग रागेश्री बहार यांचे दमदार सादरीकरण केले. ‘शून्य गढ शहर...’ या निर्गुणी भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना श्रीराज ताम्हणकर (तबला), अमेय बिचू (संवादिनी) यांनी साथ केली. मंगेश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.  

Post a Comment

0 Comments