पुणे : पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांच्या स्वरनिनाद संस्थेतर्फे ‘गंगाधर स्वरोत्सव २०२३’ या संगीत महोत्सवाचे २७ ते २९ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. निसळ यांच्यातर्फे त्यांचे गुरु पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सलग ७ वर्षे हा सांगीतिक महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे यंदाचे हे ८ वे वर्षे आहे. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्राच्या अॅम्फीथिएटर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रम सशुल्क आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
पहिल्या दिवशी (शुक्रवार, २७ जानेवारी) पं. राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरीवादन होणार आहे. पं. बाळासाहेब कुलकर्णी यांचे पुत्र व शिष्य असलेल्या पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी पं. नारायणराव पटवर्धन यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. कार्यक्रमात त्यानंतर पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी अमोणकर आणि पद्मश्री पं. जितेन्द्र अभिषेकी यांच्या जेष्ठ शिष्या देवकी पंडित यांचे गायन होणार आहे. आपल्या अनोख्या गायन शैलीसाठी त्या ओळखल्या जातात.
दिसऱ्या दिवशी (शनिवार, २८ जानेवारी) मैहर सेनी घराण्याचे सरोदवादक पं शेखर बोरकर यांचे पुत्र व शिष्य अभिषेक बोरकर यांचे सरोदवादन होईल. त्यानंतर गायक अमोल निसळ हे आपली गायनकला सादर करतील.
तिसऱ्या व शेवटच्या दिवशी (रविवारी, २९ जानेवारी ) पहिल्या सत्रात मंजुषा पाटील यांचे गायन होणार आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका असलेल्या मंजुषा पाटील यांनी पं चिंटूबुवा म्हैसकर, पं केणेबुवा आणि पं उल्हास कशाळकर यांच्याकडून गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे. ख्याल गायकी बरोबरच ठुमरी, भजन व नाट्यसंगीतात त्यांनी प्रावीण्य मिळविले आहे.
फारुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध तबला व सतारवादक पं. नयन घोष यांच्या सतार वादनाने ८ व्या गंगाधर स्वरोत्सवाची सांगता होणार आहे. पं. घोष यांनी आपले वडील व प्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण पं. निखील घोष यांच्याकडून गायन, तबला व सतार वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे.
त्यांचे काका पं. पन्नालाल घोष हे प्रसिद्ध बासरीवादक होते, तसेच त्यांना उत्तर भारतीय बासरीचे जनक म्हणून संबोधले जात. पं. नयन घोष हे देशातील अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये संगीत शिक्षणाचे कार्य करतात.
शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी महोत्सवात पं प्रमोद मराठे यांचा ज्ञानदा पुरस्कार देत सन्मानित करण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रातील गुरूंना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून रोख रु. ११ हजार व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सदर महोत्सव सशुल्क असणार असून, तिकीट खिडकी या संकेतस्थळावर कार्यक्रमाची तिकिटे उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात तिकिटे उपलब्ध असणार आहे. यासाठी +919096083785 या क्रमांकावरदेखील संपर्क साधता येईल, याची कृपया नोंद घ्यावी. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अर्चिस अन्नछत्रे, प्रीतम मंडलेचा आणि प्रसिद्ध उद्योजक विशाल चोरडिया यांचे सहकार्य लाभले आहे.
0 Comments