नृत्य, गायन आणि नाटयातून भारतीय संस्कृतीचे दर्शन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व

योजनेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात ; यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान


पुणे : भारतीय प्राचीन परंपरेतील नृत्यकलेतून केलेली गणेशाची आराधना...कोळी गीत, शौर्य गीतांतून सादर झालेली देशभक्ती आणि मुलगा मुलगी वाद नको, मुलगी झाली खेद नको... असे सांगत जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पुणेकरांसमोर नृत्य, नाटय, गायनाचा सुरेख मिलाफ सादर केला. रंगीबेरंगी पोषाखात नटलेले चिमुकले, चेह-यावर उमटलेले निरागस भाव आणि पारंपारिक, ऐतिहासिक, देशभक्तीपर गीतांवर बालचमूंनी सादर केलेल्या कलाप्रकारांना उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी शि.प्र.मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन,



सुलभ शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ.उमा बोडस, पं.वसंतराव गाडगीळ, शुभांगी भालेराव, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, अक्षय गोडसे यांसह सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक इंद्रजीत रायकर, राजाभाऊ पायमोडे, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, सिद्धार्थ गोडसे यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


अ‍ॅड.एस.के.जैन म्हणाले, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा त्रिसूत्रीद्वारे ट्रस्टचे काम सुरु आहे. अनेकजण मेहनतीने काम करुन कष्टपूर्वक पुढे जातात. समाजात अनेक संधी उपलब्ध आहेत, त्या आपण शोधायला हव्या. प्रत्येकामध्ये हुशारी असते, मात्र त्यांना संधीची गरज असते. शिक्षकांना योग्य मान देणे गरजेचे आहे.



व्यक्ती, माणूस आणि चांगला नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात. भारतात बुद्धीमता आहे, ती अधिक विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दगडूशेठ ट्रस्टच्या उपक्रमामुळे पालकत्व योजनेतील मुलांमध्ये झालेला बदल दिसून येत आहे. तसेच यामुळे त्यांच्यामध्ये देखील इतरांना मदत देण्याची भावना रुजलेली दिसते.

 

डॉ.उमा बोडस म्हणाल्या, श्री गणेश ही बुद्धी व कलांची देवता आहे. मंदिर म्हणजे एखादी व त्यामध्ये परमेश्वर असे नाही. तर सामाजिक काम करणारी संस्था देखील असते. प्रतिकूल परिस्थिती असून देखील ज्यांची बौद्धिक क्षमता जास्त आहे. अशा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कार, समुपदेशन  मिळाले. तर सामान्य मुले देखील उत्तम विद्यार्थी होऊ शकतात.


असे समाजकार्य आज ट्रस्टतर्फे सुरु आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव या ट्रस्टच्या पालकत्व योजनेच्या माध्यमातून मुलांमध्ये रुजलेली दिसते, असेही त्यांनी सांगितले. योजनेतील विद्यार्थीनी दिपीका पद्मा, आरती कल्याणी यांनी देखील मनोगत केले.

 


महेश सूर्यवंशी म्हणाले, जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत सन २०१० साली जय गणेश पालकत्व योजना सुरु झाली. मराठी शाळांमधून ५०० पेक्षा जास्त गरजवंत व हुशार विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांची शैक्षणिक जबाबदारी ट्रस्टने घेतली आहे. ज्यावेळी विद्यार्थी आत्महत्या हा विषयी पुढे आला होता, त्यावेळी ही योजना सुरु झाली होती. 


आजमितीस योजनेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत असून हे योजनेचे यश आहे. आज, योजनेतील विद्यार्थी समाधान कांबळे हा इस्त्रोमध्ये वैज्ञानिक व सुनील शेरकर हा मरिएट हॉटेलमध्ये शेफ पदावर कार्यरत आहे. तसेच तहसीलदार पदावर २, पीएसआय पदावर २७ जण सेवेत कार्यरत असून एका विद्यार्थ्यांनी पीएचडी, २३ जण इंजिनियर, ६ जण एमएससी, १२ जण बीएससी, ४ जण एमए, ३२ जण बीकॉम आणि ११ विद्यार्थी बीए झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. अंजली जाधव, श्रीपाद एडके यांनी सूत्रसंचालन केले.  

Post a Comment

0 Comments