उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांचे मत; आयसीएआय पुणे शाखेतर्फे दीक्षांत सोहळा
पुणे : "सनदी लेखापाल (सीए) यासारख्या अवघड परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी आणि त्याना पाठींबा देणाऱ्या त्यांच्या पालकांचे कौतुक आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून, त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात योगदान द्यायचे आहे. शाश्वत आर्थिक प्रगतीसाठी सनदी लेखापालांनी प्राधान्य द्यावे," असे मत प्रसिद्ध उद्योजक व प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे आयोजित दीक्षांत समारंभात डॉ. चौधरी बोलत होते. बाणेर येथील बंतारा भवनमध्ये झालेल्या समारंभात जवळपास ७५० पेक्षा अधिक विदयार्थ्याना पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी ६०० पेक्षा अधिक पालक उपस्थित होते. प्रसंगी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, सीए दिनेश गांधी, सीए दिलीप दीक्षित, दीक्षांत समारंभाचे समन्वयक आणि केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, विभागीय समितीचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, खजिनदार सीए प्रणव आपटे, सीए सचिन मिनियार, सीए अमृता कुलकर्णी, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.
डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, "सध्याच्या युगात आपण भवतालच्या बदलांबद्दल सतर्क राहिले पाहिजे. अद्ययावत होत असलेल्या नव्या गोष्टी आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. जीवनात पुढे जाण्यासाठी चांगले बदल अत्यंत महत्त्वाचे असून, परिवर्तनासाठी कधीही घाबरू नका. त्यासाठी तयार राहून प्रयत्न, बांधिलकी आणि प्रामाणिकपणा अंगीकारत यशामार्गावर चालावे. सनदी लेखापाल हा उद्योग क्षेत्राच्या अतिशय जवळचा घटक असल्याने त्याच्यावर आर्थिक विकासाचे दायित्व अधिक आहे."
सीए मिलिंद काळे म्हणाले, "बँकिंग आणि फायनान्स हे खूप विस्तीर्ण क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. ऑडिटसह अन्य गोष्टींसाठी बँका सनदी लेखापालांवर अवलंबून असतात. त्यामुळे या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण योगदान देऊन भारताच्या अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचे दायित्व सीए म्हणून आता तुमच्यावर आले आहे."
सीए दिलीप दीक्षित म्हणाले, "सीएच्या स्वाक्षरीला अधिक महत्व आहे. भविष्यात अधिक प्रगती करावयाची असल्यास अद्ययावत आणि तांत्रिक ज्ञान घेणे गरजेचे आहे. देशाला अधिक चांगली सेवा देण्यासाठी नीतिमान आणि उत्कृष्ट काम करणारे सीए हवे आहेत. आज १३० कोटी जनतेमध्ये केवळ ३.१५ लाख सीए आहेत. यामुळे सीएला मोठ्या संधी उपलब्ध आहेत."
सीए दिनेश गांधी म्हणाले, "सीए व्यवसायाची प्रगती आणि सदस्यांचे कौशल्य तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. 'आयसीएआय'द्वारा आयोजित प्रमाणपत्र अभ्यासक्रम, ज्ञान केंद्र, डिजिटल लर्निंग हब विकसित होत आहे. सदस्यांना कौशल्याभिमुख कारण्यासाठी नवे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. जगभरात भारतीय सीएना संधी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरु आहेत."
सीए चंद्रशेखर चितळे यांनी 'आयसीएआय'कडून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांविषयी सांगितले. तसेच सनदी लेखापालांना शपथही दिली. सीए काशिनाथ पठारे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए यशवंत कासार यांनी आभार मानले.
0 Comments