म.गांधी पुण्यतिथीदिनी सामुदायिक प्रार्थना, व्याख्यान संपन्न

गांधीजींच्या ' धर्मविचार ' पुस्तकांचे प्रकाशन



पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे सोमवारी,३० जानेवारी रोजी सकाळी साडे आठ  वाजता सामुदायिक प्रार्थना,ज्येष्ठ पत्रकार आणि गांधीविचारांचे  अभ्यासक  अरूण खोरे यांच्या व्याख्यानाचे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडून आयोजन करण्यात आले होते.


यावेळी महात्मा गांधी लिखित 'धर्मविचार भाग-१ आणि धर्मविचार भाग-२' या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. हे कार्यक्रम  गांधी भवन, कोथरूड येथे झाले . महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 


 डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड , आदित्य आरेकर , श्रीकृष्ण बराटे आदी उपस्थित होते.अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. जांबुवंत मनोहर यांनी आभार मानले.


अरूण खोरे म्हणाले, 'गांधी विचार संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र आणि उत्तर भारतात हा प्रयत्न अधिक होत आहे. त्याला उत्तर दिले पाहिजे.जगभर अनेक विद्यापिठात गांधीजींच्या विचाराचा अभ्यास सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर  लोकसेवक संघ सुरू करा असे गांधीजींनी सांगितले याचा अर्थ काँग्रेसने राजकारण सोडावे, पोकळी निर्माण करावी, असा त्याचा अर्थ होत नाही.


गांधीजींना बदनाम करण्याची कट कारस्थाने सुरू आहेत. गांधीजी, नेहरूजी  हिंदू होते, की मुसलमान हे महत्वाचे नाही, ते श्रेष्ठ भारतीय, श्रेष्ठ मानव आहेत, हे महत्वाचे आहेत. गांधीजींना मोठया प्रमाणात स्वीकारले गेले आहे. हा विचारांचा ठसा अमीट आहे. हा वारसा पुढे नेला पाहिजे. काँग्रेसची जबाबदारी त्यासंदर्भात अधिक आहे.कॉंग्रेसने निष्प्रभ  होऊन चालणार नाही. गांधी मार्गाने आपल्याला जाता आले नाही, म्हणून आपण गांधीजींची क्षमा मागितली पाहिजे. गांधीजींनी लोकांच्या मनातील भीती दूर केली. आता पुन्हा लोकजीवनात भीती दाटून आली आहे. महाशक्तीला सगळे घाबरत आहे. ही भीती दूर करण्याची गरज आहे. गांधीजींनी विचार, कृतीचे दान आपल्या झोळीत टाकले आहे, पण आपली झोळी फाटकी आहे, आपण हा वारसा समर्थपणे पुढे नेऊ शकत नाही.


  'गांधी विचाराचे चैतन्य जपण्याचे  प्रयत्न  महाराष्ट्र गांधी स्मारक निधी    करीत आहे, ते महत्वपूर्ण आहेत ', असेही श्री.खोरे म्हणाले.


अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, 'म. गांधींनी प्रश्न सोडविण्याचा वेगळा मार्ग जगाला दाखवला म्हणून त्यांचे श्रेष्ठत्व जगाला वाटते. त्यांचा विचार संपणार नाही, ते ऑक्सीजनप्रमाणे अवती भवती आहेत. गांधीजींना मारण्याचे ६ प्रयत्न झाले. पृथ्वी नष्ट करण्याच्या प्रयत्नाना गांधीविचार हे उत्तर आहे. गांधी हत्येनंतर उसळलेल्या असंतोषानंतर महाराष्ट्रातील अर्क पुण्यात एकत्र झाला. संघाला त्रेतायुग परत आणायचे आहे.धर्मातील चुकीच्या गोष्टी टाकल्याशिवाय मानवतेची प्रगती होणार नाही. हाच संदेश गांधीजींच्या धर्मविचार पुस्तकात सांगितला आहे. आता गांधीजी कोणत्याही पक्षातून निर्माण होणार नाही, मात्र सामान्य माणसातूनच पुढे येईल '.


अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. जांबुवंत मनोहर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments