धर्माला समाजाविरुद्ध उभे करण्याचा धर्मवेड्यांकडून प्रयत्न

डॉ. रजिया पटेल यांचे परखड प्रतिपादन


तळेगाव दाभाडे / पुणे : एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या, समाजाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न धर्मवेड्या लोकांकडून केला जातो. ही मंडळी समाजातील विषयमतेबाबत बोलत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विचारवंत डॉ. रजिया पटेल यांनी व्यक्त केली.


तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे आयोजित कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना 'भारतीय एकात्मता' या विषयावर त्या बोलत होत्या.


यावेळी सुचित्रा कराड नागरे, निरुपा कानिटकर, सीमा कांचन कदम, पूजा डोळस, शैलजाताई काळोखे, ट्रस्टचे संस्थापक डॉ. कृष्णकांत वाढोकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष माजी नगरसेवक निखिल भगत, सचिव डॉ. वर्षा वाढोकर, मिलिंद निकम, राजेश बारणे, अतुल पवार, अमित बांदल, ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे, मयूर भरड आदी उपस्थित होते.


डॉ. रजिया पटेल म्हणाल्या, भाषा, संस्कृती, भौगोलिक विविधता ही आपल्या देशाची, लोकशाहीची ताकद आहे, त्यात एकात्मता दडलेली आहे. राष्ट्रप्रेमाच्या, एकात्मतेच्या आज वेगवेगळ्या आणि सोयीनुसार व्याख्या केल्या जात आहेत. जात, धर्म, वंश म्हणजे राष्ट्र नव्हे. देशाच्या एकात्मतेला बळ देण्यास देशातील संत परंपरा, सुफी संत यांचे मोठे योगदान आहे.


समानता, मानवता, प्रेम त्यांनी शिकविले. या शिकवणीला, देशाच्या एकात्मतेलाच धर्मवेड्या लोकांमुळे धोका निर्माण झाला आहे. भारताची एकात्मता ही येथील विविधतेवर अवंलबून आहे. अनेक जाती, धर्म, पंथ, संस्कृती, भौगोलिक विविधता ही आपली ताकद आहे. आपल्या लोकशाहीला बळकटी याच विविधतेतून मिळाली. याकडे लक्ष न देता आक्रमक राष्ट्रवाद मांडला जातो आहे.


डॉ. रजिया पटेल पुढे बोलताना म्हणाल्या, की पूर्वी जिल्हा परिषद शाळांमधूनच समानतेचा पाया घातला जात होता. आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे गरीब श्रीमंत दरी रुंदावत चालली आहे. जाती धर्माच्या नावाने समाजात दुही पसरवली जात आहे, ही चिंतेची बाब आहे. धार्मिक अस्मिता महत्वाची की पोटापाण्याच्या प्रश्नाला महत्त्व द्यायचे, याचा क्रम ठरविण्याची वेळ आली आहे.


प्रास्ताविक डॉ. वर्षा वाढोकर यांनी, सूत्रसंचालन डॉ.  मीनल कुलकर्णी यांनी, तर आभार उर्मिला छाजेड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments