अश्वेत नागरिकाच्या हत्येनंतर अमेरिकेत हिंसाचाराचा आगडोंब

अनेक शहरांमध्ये नागरिक रस्त्यांवर, मुद्द्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद

Violence erupts in US after black citizen murder

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - कोरोनाच्या भीषण संकटाचा सामना करीत असतानाच आता अमेरिका एका आणखी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. एका अश्वेत नागरिकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून, हजारो नागरिक रस्त्यांवर उतरून निदर्शने करीत आहेत. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरल्याने अमेरीकी प्रशासनासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

या घटनेची सुरवात 25 मे रोजी सुरू झाली. अमेरिकेतील मिनीपोलिस शहरात एक श्वेत पोलिस अधिकारी डेरेक चाऊविन याने जॉर्ज फ्लॉयड नामक व्यक्तीला अटक केली. त्यानंतर भर रस्त्यावरच जॉर्जची मान डेरेक याने आपल्या पायाने तब्बल आठ मिनिटे दाबून धरली आणि त्यानंतर जॉर्ज याचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ संपूर्ण अमेरिकेत व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये जॉर्ज आपला श्वास कोंडला जात असल्याचे पोलिस अधिकाीर डेरेक याला सांगत असल्याचे दिसत आहे. असे असतानादेखील डेरेकला त्याची कुठलीही दया आली नाही. एव्हढेच नव्हे तर तेथे उपस्थित बाकी अधिका-यांनीदेखील डेरेकला हे सर्व करण्यापासून रोखले नाही.

जेंव्हा जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाला, तेंव्हा त्याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमादेखील आढळून आल्या. ही घटना संपूर्ण अमेरिकेत वा-यासारखी पसरली आणि त्यानंतर अमेरिकेतील अश्वेत नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला.

Violence erupts in US after black citizen murder

या घटनेनंतर अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हजारो नागरिक रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी जाळपोळ, लुटालूट सुरू केली. अनेक वाहनांनादेखील आगी लावल्या. हिंसाचार आणि आंदोलनांचे हे लोण वॉशिंग्टन डीसी, डेनवर, लास वेगास, लॉस एंजिलीस, फिनिक्स अशा अनेक शहरांपर्यंत पसरले.

सध्या अमेरिका जगात सर्वात जास्त कोरोना संकटाचा सामना करीत आहे. आतापर्यंत अमेरिकेत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण अमेरिकेत लॉक डाउन घोषित करण्यात आला आहे. मात्र हजारो नागरिक रस्त्यांवर उतरून लॉक डाउनचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. अनेक नागरिक रस्त्यांवर झोपून आंदोलन करीत आहेत.

नागरिकांच्या या हिंसक आंदोलनांमुळे अनेक ठिकाणी रेलवे आणि रस्त्यांवरील वाहतुकीवर झाला आहे. अनेक शहरांमधून धुराचे आणि आगीचे लोळ उठताना दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेतील वातावरण ढवळून निघत आहे.


दरम्यान, हे संपूर्ण आंदोलन सुरू असतानाच डेट्रॉयट शहरामध्ये अज्ञात व्यक्तीने आंदोलनकर्त्यांवर गोळी झाडली, ज्यामध्ये एका 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी जमावावर कुठल्याही प्रकारे गोळीबार केला नसल्याचा खुलासा डेट्रॉयट प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर लोक आणखीनच प्रक्षुब्ध झाले आणि आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले.

दरम्यान, वाढता हिंसाचार आणि कोरोनाची गंभीर स्थिती पाहता अमेरिकी लष्कराचे मुख्यालय असलेल्या पेन्टॅगॉन ने लष्कराला तयार राहण्याचे आदेश दिलेले आहेत, तसेच हिंसाचार न थांबल्यास मिनिपोलिस शहरात लष्कराला तैनात करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येत आहे.

अमेरिकेत गो-या लोकांकडून अल्पसंख्यांक अश्वेत नागरिकांच्या विरोधात अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडत असतात. तसेच आजवर अनेक अश्वेत नागरिक हे अमेरिकेतील पोलिस अत्याचारांचे बळी ठरले आहेत. 1960 च्या दशकात अमेरिकेत ब्लॅक पँथर नावाची प्रचंड मोठी चळवळ राबवल्या गेली होती.

दरम्यान, या प्रकरणाचे आता आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पडसाद उमटताना दिसून येत आहेत. या घटनेचे भांडवल करून चीन आणि रशिया या मुद्द्याला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आधीच कोरोनाच्या प्रकरणावरून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव शिगेला पोचला आहे. त्यात या घटनेने आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचे दिसू नयेत आहे.

Tags - Violence erupts in the US after black citizen murder

Post a Comment

0 Comments