‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष सुहास मर्चंट यांची माहिती
पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि टाळेबंदी यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 'क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याबद्दलच्या 'कुशलता' या एका मोठ्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुमारे सुमारे ५० हजार बेरोजगार तरुणांना योग्य ते प्रशिक्षण देऊन बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती 'क्रेडाई पुणे मेट्रो'चे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष अमर मांजरेकर आणि अनिल फरांदे यांनी हा उपक्रम विकसित करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. सदर उपक्रम हा 'कुशल क्रेडाई'च्या माध्यमातून राबविण्यात येणार असून या उपक्रमाच्या पथदर्शी प्रकाल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील एक हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे.
पथदर्शी प्रकल्पा अंतर्गत पहिले प्रशिक्षण शिबिर पुणे शहरात घेण्यात येईल व त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्ये देखील अशा प्रकारची शिबीरे ताळेबंदी उठल्यानंतर घेण्यात यावीत यासाठी आम्ही प्रयत्न करू. बांधकाम क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही राज्यातील विविध पातळीवरच्या स्थानिक प्रशासनाची मदत घेऊ.
याविषयी बोलताना 'कुशल क्रेडाई'चे प्रमुख जे. पी. श्रॉफ म्हणाले की, कुशल क्रेडाईच्या माध्यमातून आजवर ३५ हजाराहून अधिक बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा प्रदीर्घ अनुभव आम्हाला 'कुशलता' हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
या आधी इतर क्षेत्र काम करत असलेल्या कामगारांना बांधकाम क्षेत्रात यायचे असल्यास हे प्रशिक्षण उपयुक्त ठरू शकते व त्यामुळे त्याला बांधकाम क्षेत्रात सामावून घेणे सोपे होईल. सदर प्रशिक्षण शिबिरासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.तसेच प्रशिक्षणार्थींची राहण्याची आणि जेवणाची सोय देखील ठेकेदारांतर्फे करण्यात येईल अशी योजना असल्याचे श्रॉफ यांनी नमूद केले.
क्रेडाई पुणे मेट्रोचे मानद सचिव आदित्य जावडेकर म्हणाले की, आजमितीला पुणे आणि लगतच्या परिसरात विकसित होत असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांवर सुमारे ५० हजार कुशल बांधकाम कामगारांची गरज आहे. त्यामुळे कुशलता उपक्रमांतर्गत प्रशिक्षित होणाऱ्या कुशल कामगारांना लगेचच रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
यात प्रशिक्षणाबरोबरच रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी देखील 'क्रेडाई पुणे मेट्रो' कार्यरत असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांनी या संधीचा आवर्जून लाभ घ्यावा. या संबंधीचा अधिक तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.
0 Comments