आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र स्थानांतरण केल्यास सीटू करणार तीव्र आंदोलन

सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड यांचा इशारा

If the International Financial Services Center is relocated, there will be intense agitation

मुंबई - आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र म्हणजे IFSC गुजरात मध्ये हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा सेंटर आॅफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) तीव्र निषेध करीत आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मोदी सरकार हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काॅम्रेड डी. एल. कराड यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कराड यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रावर हल्ला करण्या-या पंतप्रधान नरेंद्र मोदीचे गुजरात धार्जिणे खरे स्वरूप उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन व संयुक्त महाराष्ट्र दिनी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरात मध्ये हलवण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि आर्थिक शक्तीवर हल्ला केला आहे.

पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून भारताचे आर्थिक राजधानी म्हणून मान्यता पावलेल्या मुंबई शहरावर सातत्याने हल्ले करीत आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून कमजोर करण्याचे कारस्थान गेली सहा वर्ष सातत्याने सुरू आहेत.

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचे  मोरारजी देसाई यांचे  कारस्थान मराठी जनतेने प्रचंड बलीदान करून हाणून पाडल्यामुळे  पंतप्रधान महाराष्ट्राबाबत भेदभाव करून सूड उगवीत आहेत काय असा प्रश्न मराठी जनतेला पडला आहे.

भाजपा प्रणित केंद्र सरकारने हा केलेला महाराष्ट्रद्रोह जनता कधीच सहन करणार नाही. केंद्र सरकारने हा निर्णय रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र सीआयटीयूच्या वतीने करण्यात येत असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात कराड यांनी म्हटले आहे.

दुर्दैवाने महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना मुख्यमंत्री केले ते देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणे पंतप्रधानांची री ओढत आहेत. भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भ करण्याची मागणी करून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला होताच, ते कारस्थान अजूनही सुरू आहे.

एकंदरच भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या मुळावर उठले आहेत. मराठी जनता या महाराष्ट्र विरोधी कारवाया करणा-यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सीटूच्या वतीने देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने हा निर्णय रद्द न केल्यास सीटू आणि अन्य कामगार संघटना तसेच जनतेला बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करतील असा इशारा या पत्रकातून कराड यांनी दिला आहे.

Tags - If the International Financial Services Center is relocated, there will be intense agitation

Post a Comment

0 Comments