विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकरांनी दिली माहिती
पुणे - विभागातील मान्सूनपूर्व तयारीचे नियोजन, आपत्ती व्यवस्थापनाचा परिपूर्ण आराखडा, नाल्यांची सफाई, पावसाळयापूर्वीची कामे पूर्ण करण्याबाबतचे नियोजन, तसेच गतवर्षी विभागात सांगली व कोल्हापूर जिल्हयात गंभीर पूरपरिस्थिती उद्भवली, त्यादृष्टीने खबरदारीचे नियोजन यासह पुणे विभागातील मान्सूनपूर्व तयारीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे माहिती घेतली.
मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबतचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, गतवर्षी पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. या वर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत नियोजन करण्यात आले आहे.
नद्यांच्या खोलीनुसार व नदीच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज घेवून जास्त क्षमतेच्या बोटी खरेदी तसेच शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटाचा सामना करताना मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत आम्ही दक्षता घेतल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना गतवर्षातील त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे.
पावसाळयापूर्वीची कामे वेळेत पूर्ण होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुण्याच्या आंबील ओढयाबाबतची दक्षता तसेच गतवर्षी अलमट्टी धरणाचा विसर्ग न वाढल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्हयात पूरस्थिती उद्भवली, यावर्षी याबाबतच्या दक्षतेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
पुणे विभागातील बहुतांश महानगरपालिका क्षेत्रातील शाळा कोवीड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे पावसाळयाच्या कालावधीतील संभाव्य अडचणीच्या कालावधीत निवा-याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
0 Comments