राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश
पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने विविध तक्रार निवारणासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वेबिनार किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. या आदेशाची पुणे प्रादेशिक विभागात ताबडतोब अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी दिले आहे.
कोरोना विषाणूमुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमिवर सर्व वर्गवारीतील ग्राहकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधून वीजपुरवठा, वीजबिल, वीजयंत्रणेची दुरुस्ती आदींबाबत गाऱ्हाणी, प्रश्न, अपेक्षा व अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे तसेच ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवांची माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
या अनुषंगाने पुणे प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विभाग व उपविभागस्तरावर व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करावे आणि वीजग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश दिले आहे.
तसेच श्री. नाळे हे स्वतः पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील औद्योगिक व अतिमहत्वाच्या ग्राहकांशी संवाद साधणार आहे. या वीजग्राहकांसाठी संबंधीत मंडलचे अधीक्षक अभियंता हे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करणार आहेत. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या आयोजनाची तारीख व वेळेची पूर्वमाहिती संबंधीत स्थानिक कार्यालयाकडून वीजग्राहकांना कळविण्यात येणार आहे.
याआधी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महावितरणचे सुमारे 1800 अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी तसेच रिडींग व बिल वाटप एजंसी, विविध योजनांमधील कंत्राटदार आदींशी थेट संवाद साधून कामांचा आढावा घेतला आहे.
यासोबतच पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार व गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार यांनी 180 सोसायट्यांच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी स्थानिक अभियंत्यांसमवेत नुकताच वेबिनारद्वारे संवाद साधला आहे.
0 Comments