जागतिक नृत्यादिनी साधत गुरु शमा भाटे यांच्या 'नाद-रूप'ची डिजिटल प्रस्तुती.
पुणे - 'हा लॉकडाऊन आहे, लॉकअप नव्हे' हेच स्पष्ट करत सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे व त्यांच्या शिष्यांनी जागतिक नृत्यादिनाचे औचित्य साधत एक विशेष प्रस्तुती डिजिटल माध्यमातून सादर केली आहे.
'नादरूप' एकोज (प्रस्तुत) 'शुभं भवतु' या विशेष सादरीकरणात 'कोरोना'शी लढताना, लॉकडाऊन पाळण्यासाठी घ्यावयाची काळजी अत्यंत कलात्मक, आकर्षक व रंजक पद्धतीने मांडत 'शुभं भवतु'चा प्रतिध्वनी 'नाद-रूप'च्या नृत्य कलाकारांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
जगाला विळखा घालून बसलेल्या या 'कोरोना'तून सुटण्यासाठी 'लॉकडाऊन'चे नियम काटेकोररित्या पाळणे आवश्यक आहे. परंतु काही लोक याकडे कानाडोळा करत नियमांचे उल्लंघन करतात. हे नियम पाळणे किती महत्वाचे आहे, ही शिक्षा नसून संधी आहे, हेच आकर्षक व रंजक पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे 'नाद-रूप'च्या संस्थापक संचालिका गुरु शमा भाटे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, "या संकटाच्या काळात सक्तीने घरी बसणे हे लोकांना शिक्षा वाटून ते बाहेर पाडण्यासाठी नाही नाही ते प्रयत्न करतात हे बातम्यांद्वारे सततच समोर येत आहे. परंतु याकडे शिक्षा म्हणून नव्हे तर संधी म्हणून बघा. याकाळात अनेक सकारात्मक, सर्जनशील गोष्टी करता येऊ शकतात.
आपण एकत्रितरित्या लढा देऊन ही लढाई नक्कीच जिंकू असाच संदेश आम्ही या कलाकृतीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकच जण आपापल्या परीने या लढाईत आपले योगदान देत आहे. कलात्मकरीत्या दिलेला संदेश अधिक रंजक होऊन तो लोकांपर्यंत सहज पोहचू शकतो म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. यात आम्ही सोशल डीस्टनसिंग, हात धुणे, मास्क वापरणे आदि संदेशही कलात्मकतेने दिला आहे."
"दिल्लीच्या डॉ. अर्शिया सेठी यांच्या हाच संदेश देणाऱ्या इंग्रजी कावेतेच्या आधारे ही कलाकृती रंगते. यात माझ्या आठ शिष्यांनी सादरीकरण केले आहे. परंतु हे सर्व सदरीकरण लॉकडाऊनचे नियम पळत आपापल्या घरी प्रत्येकीने व्हिडीओ रेकॉर्ड केले.
नंतर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच त्याचे संकलन, साऊंड आदि आवश्यक पूर्तता करून ही संपूर्ण कलाकृती आपल्या समोर सादर करण्यात आली आहे. पारंपारिक कला नव्या डिजिटल माध्यमाशी, तंत्रज्ञानाशी सांगड घालत आहे.
त्यामुळेच केवळ चार दिवसांमध्ये हे संपूर्ण सादरीकरण आम्ही उभे करू शकलो. आपापल्या घरी कलाकार असल्याने त्यांना सांगीतिक साथसंगत उपलब्ध असणे अवघड होते. त्यामुळे टाळ्यांचे ताल, पढंत यावर हे सादरीकरण होत आहे. त्यामुळे कमीत कमी संगीतावर आधारित नृत्यकलाकृती हे देखील याचे एक वैशिष्ट्य आहे," असेही त्यांनी सांगितले.
या कलाविष्कारासाठी मूळ कविता डॉ. अर्शिया सेठी यांची असून नृत्य दिग्दर्शन शमा भाटे, सहाय्यक अमीरा पाटणकर यांचे आहे. यात अमीरा, अवनी, शिल्पा, रागिणी, शिवानी, भार्गवी, नीरजा, ईशा यांनी नृत्य सादरीकरण केले आहे.
कविता अभिवाचन शिल्पा भिडे व निखील रवी परमार यांनी केले आहे. चैतन्य आडकर यांचे संगीत असून साऊंड / रेकॉर्डिंग ईशान देवस्थळी यांचे तर संकलन अपूर्व साठे यांनी केले आहे. हे सादरीकरण सर्व सोशल माध्यमांवर उपलब्ध असून 'यु-ट्यूब' वाहिनी पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
0 Comments