कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कात्रज पोलीस चौकी येथे उभारणी
पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने अत्यावश्यक सेवा देणा-या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पतीत पावन संघटना, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे व फाईव्ह स्टार मित्र मंडळ, धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज पोलीस चौकी येथे निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणा-या या सुपर हिरोज साठी ही सुविधा संघटनेने उपलब्ध करुन दिली आहे.
हातावर पोट असलेल्या गरजूंना अन्नधान्य मिळत नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पतित पावन संघटना व कुमावत युवा संघटनेने एकत्रितपणे शहर परिसरात २ हजार ५०० अन्नधान्य किटचे वाटप केले.
पर्वती दर्शन, गुलटेकडी, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, शनिवार पेठ यांसह आजूबाजूच्या परिसरातील गरजूंना देण्यात आले. याकरीता पतीत पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, खडकवासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर, अक्षय अभंग, योगेश पाटील आदींनी पुढाकार घेतला आहे. या किटमध्ये ५ किलो गव्हाचे पीठ, १ किलो तांदूळ, १ किलो डाळ, २५० ग्रॅम मसाले, १ तेल पाकिट, २०० ग्रॅम मीठ आदी गोष्टींचा समावेश आहे.
स्वप्निल नाईक म्हणाले, संघटनेने एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत गरजूंना १ हजार मोफत भोजनाच्या डब्यांचे वाटप यापूर्वी केले होते. याशिवाय कात्रज परिसरात एक हँडवॉश सह फिरते बेसिन बसविण्यात आले असून, शिवाजीनगर परिसरात चहा-नाश्ता आणि मध्यभाग परिसरात साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
आता पोलीस कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. तसेच लॉकडाऊन वाढल्याने दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. त्यांना अन्नधान्याची मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0 Comments