पुनीत बालन ग्रुप, 'इंडस कोअर' व सम्यक ट्रस्टचा उपक्रम
पुणे - पुनीत बालन ग्रुप, इंद्राणी बालन फाउंडेशन, इंडस कोअर एज्युकेशन फाउंडेशन आणि सम्यक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील ५०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आटा, तांदूळ, तुरडाळ, साखर, तेल, मीठ यासह जवळपास १५ वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे. पुनीत बालन ग्रुपकडून शहर आणि जिल्हा परिसरात जवळपास १० हजार जीवनावश्यक वस्तूंसह व इतर साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील गरजू कुटुंबाची यादी करून या वस्तूंचे वाटप केले. झोपडपट्टीतील कुटुंबाना अधिक प्राधान्य देण्यात आले. या कामात 'रिपाइं'चे राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, 'रिपाइं'चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, ज्येष्ठ कार्यकर्ते रोहिदास गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे. या सगळ्या कामात गणेशोत्सव कार्यकर्ते असलेले पुनीत बालन स्वतः व्यक्तिगत लक्ष देत आहेत.
पुनित बालन या वेळी म्हणाले, "तमाशा कलावंत, पडद्यामागील कलाकार, वृत्तपत्र विक्रेते यांसह शहर आणि ग्रामीण भागातील गरजूंना आर्थिक, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य केले जात आहे. सामाजिक भावनेने केलेल्या या कार्यातून गरिबांना मदतीचा हात देता येतोय, याचे समाधान आहे. यापुढेही जिथे गरज लागेल, तिथे पुनीत बालन ग्रुप सहकार्य करेल."
ऍड. मंदार जोशी म्हणाले, "लॉकडाऊन झाल्यापासून गेल्या महिनाभरात पुनीत बालन ग्रुपने केलेले काम उल्लेखनीय आहे. अनेक कुटुंबाना त्यामुळे आधार मिळाला आहे. आमच्या संस्थांच्या माध्यमातून या गरजू कुटुंबांना मदत देण्याची कल्पना देताच बालन यांनी मदतीचा हात पुढे केला. ५०० कुटुंबांना पुढील १५ दिवस पुरेल, इतके अन्नधान्य देण्यात आले आहे."
बाळासाहेब जानराव यांनीही बालन ग्रुपच्या कामाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.
0 Comments