सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बुलढाणा : सर्व प्रकारच्या माजी लोकप्रतिनिधींनी आपल्या नावासमोर योग्य त्या पदनामाचा उल्लेख करावा, जेणेकरून जनतेत कोणताही संभ्रम होणार नाही, तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींचा योग्य तो मान राखला जाईल, अशी मागणी आपल्या आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या जितेंद्र जैन यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक पत्र पाठवून केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी लोकप्रतिनिधी हे स्वतःच्या नावासमोर मा. किंवा माननीय असा उल्लेख करतात. यामध्ये खासदार, मा. आमदार, मा. जिल्हा परिषद सदस्य, मा. पंचायत समिती सदस्य, मा. नगरसेवक, मा. सरपंच, मा. उपसरपंच असे पदनाम सर्रासपणे लावले जाते. विविध ठिकाणी पोस्टर्सवर हा उल्लेख उघडपणे दिसून येतो. खरेतर त्यांनी केवळ मा. किंवा माननीय ऐवजी केवळ `माजी` असाच उल्लेख करणे गरजेचे आहे.
माजी लोकप्रतिनिधींनी मा. किंवा माननीय असा उल्लेख करणे हे लोकशाहीच्या संकेतांना धरून नक्कीच नाही. यासंदर्भात आपण योग्य ते आदेश काढून या प्रकारांवर प्रतिबंध लावल्यास जनतेचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आणखी वाढेल. तसेच या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसीच्या कलम ४२० (फसवणूक) अन्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जितेंद्र जैन यांनी केली आहे.
0 Comments