पुणे : मुसळधार पावसाने पुण्यात ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी घराच्या अंगणात खेळत असताना बाहेरील शेतात साचलेल्या पाण्यात पडून २ वर्षांचा चिमुरडा बुडाल्याचे लक्षात येताच त्याला त्वरीत पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि याठिकाणी या मुलावर यशस्वी उपचार करण्यात आले. गोल्डन अवरमध्ये सीपीआर मिळाल्याने या बाळाचा जीव वाचविता आला.
अंकुरा हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागातील, डॉ. चिन्मय जोशी (सल्लागार पेडिएट्रीक इंटेसिव्हीस्ट आणि क्लस्टर मेडिकल डायरेक्टर फॅार महाराष्ट्र) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विश्रुत जोशी(बालरोग तज्ज्ञ), डॉ. निखिल झा( पेडिएट्रीक इंटेसिव्हीस्ट आणि नवजात शिशु तज्ज्ञ) डॉ. उमेश वैद्य(ग्रुप डायरेक्टर आणि नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ) यांनी अमोद थोरवे या बाळावर यशस्वी उपचार केले.
पूर्णत: बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या बाळाची हृदयाची क्रिया अतिशय कमकुवत आणि रक्तदाब कमी झाला होता. अशा गंभीर परिस्थितीतून या बाळाला सुखरुपपणे बाहेर आणण्यासाठी अंकुरा हॉस्पिटलच्या डॅाक्टरांनी सर्वस्व पणाला लावले आणि या चिमुरड्याला नव्या आयुष्याची भेट दिली.
२५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील आळंदी येथे राहणारा अमोद थोरवे(२ वर्ष) हा आपल्या अंगणात खेळण्यासाठी गेला होता. सततच्या मुसळधार पावसाने आजूबाजूच्या शेतात पाणी साचले होते. खेळण्यासाठी गेलेला अमोद बराच वेळ घरात न परतल्याने त्याच्या पालकांना तो बेपत्ता असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी त्याला घराबाहेर शोधण्यास सुरुवात केली.
तेव्हा घरासमोरील शेतात तो बुडाल्याचे दिसून आले. या प्रसंगी वेळ न दवडता मुलाच्या पालकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मुलाच्या हृदयाचे ठोके पुर्ववत करण्यासाठी सीपीआर देण्यात आला. यास मुलाने प्रतिसाद देताच पुढील उपचारासाठी अंकुरा हॉस्पिटलमधील आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले.
डॉ. चिन्मय जोशी (अंकुरा हॉस्पिटलचे पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आणि क्लस्टर मेडिकल डायरेक्टर फॅार महाराष्ट्र) सांगतात की,या रुग्णाला आळंदीहून बॅग ॲण्ड ट्यूब व्हेंटिलेशनवर अंकुरा हॉस्पिटलमधील आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. आपत्कालीन कक्षात दाखल केलेला हा चिमुरड्याची त्वचा गुलाबी पडून, ह्दयाचे ठोके देखील मंद गतीने चालत असल्याचे आढळले. कार्डियाक अरेस्टचा संकेत दिसू लागल्याने त्वरीत उपचार सुरु केले.
सायनोसिस (त्वचेवर निळसर किंवा जांभळा रंग), गंभीर एन्सेफॅलोपॅथी (मेंदूचा बिघाड) ची लक्षणे दिसू लागली आणि रुग्ण कोमॅटोज अवस्थेत होता. सलग 4 तासांच्या आक्रमक प्रयत्नांनंतर डॅाक्टरांच्या संपुर्ण टिमला यश मिळाले. या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल टीममधील 30 हून अधिक व्यक्तींचा सहभाग होता आणि या चिमुरड्याचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने अथक प्रयत्न केले.
डॉ उमेश वैद्य(ग्रुप डायरेक्टर आणि प्रमुख नवजात शिशु तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल) यांनी प्रकाश टाकला की केवळ प्रगत सुविधाच नाही तर आपत्कालीन प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून त्यांनी या रुग्णाचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. इंटेन्सिव्हिस्ट तज्ञांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण टिम या प्रकरणात कार्यरत होती.
उपचारांना या चिमुरड्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतर अवघ्या 18 तासांच्या आत त्याला व्हेंटिलेटरी सपोर्टमधून यशस्वीरित्या बाहेर करण्यात आले. त्याला मेंदू किंवा इतर कोणत्याही दीर्घकाळासाठी दिसून येणाऱ्या अवयवाच्या नुकसानीची चिन्हे दिसली नाहीत आणि अवघ्या 36 तासांनंतर त्याला घरी सोडण्यात आले. अंकुरा हॉस्पिटलमध्ये आम्ही असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जिथे आयुष्यातील वाईट प्रसंगाचा सामना करणाऱ्या कुटुंबाला नक्कीच आधार मिळतो असे डॉ चिन्मय जोशी यांनी स्पष्ट केले.
चिन्मय जोशी सांगतात की,हृदयविकाराच्या वेळी सीपीआरविषयी जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. कारण त्वरित कारवाई केल्याने एखाद्याचा जीव वाचविता येऊ शकतो. जेव्हा हृदय कार्य करणे थांबवते, तेव्हा महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा थांबतो, ज्यामुळे मेंदूचे नुकसान होते किंवा काही मिनिटांतच मृत्यू ओढावतो.
सीपीआर हा वैद्यकिय मदत मिळेपर्यंत रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनेशन राखण्यात मदत करतो. सीपीआर प्रक्रिया ही जगण्याचा दर वाढविण्यास मदत करते. यासाठी सीपीआर प्रशिक्षण आणि शिक्षणास प्राधान्य देणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा हृदयविकाराच्या स्थितीत, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा ठरतो आणि सीपीआर प्रशिक्षण घेतल्याने एखादा अमुल्य जीव वाचविता येतो.
आमच्या मुलाला पूर्वीसारखे हसताना आणि खेळताना पाहतो पाहून आम्हाला खुप आनंद झाला आहे. आमच्या मुलाला नवे आयुष्य मिळवून देणाऱ्या संपुर्ण टिमचे आणि रुग्णालयाचे आम्ही सदैव ऋणी आहोत अशी प्रतिक्रिया मुलाच्या पालकांनी व्यक्त केली.
0 Comments