प्रेक्षकांचा विनोदाकडे बघण्याचा दृष्टीकोन निखळ असायला हवा : विशाखा सुभेदार
पुणे : चांगला विनोद करणे हे दिवसेंदिवस अवघड झाले आहे. आपल्या विनोदाने आज कोणाला काय वाटेल, हे सांगता येत नाही. प्रेक्षकांची मानसिकता आणखी ब्रॉड होऊन विनोद पचवू शकणारे प्रेक्षक तयार व्हायला हवेत. हे झाले तर विनोदाकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टीकोन निखळ होईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी केले. आज राम नगरकर यांच्या ‘रामनगरी’मधील किंवा अगदी पु ल देशपांडे यांनी म्हटलेली वाक्येही प्रेक्षकांसमोर बोलावीत की नाहीत असा विचार करावा लागतो, अशी आजची परिस्थिती आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार २०२४ प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना प्रदान करण्यात आला. यानंतर राजेश दामले यांनी सुभेदार यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक सचिन मोटे आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक
सचिन गोस्वामी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रुपये ११ हजार, मानपत्र, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. राम नगरकर यांचे सुपुत्र उदय नगरकर, स्नुषा डॉ. वैजयंती नगरकर, बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाखा सुभेदार म्हणाल्या, “मी अंबरनाथ ते दादर असा रोजचा प्रवास ट्रेनने करायचे. निरिक्षणातून कलाकार घडतो, असे म्हणतात ट्रेनच्या प्रवासात मी काहीना काही शिकत गेले. या प्रवासाने मला अनेक भावनिक प्रसंग अनुभविता आले.”
सातत्याने चांगला विनोद करत राहणे ही अवघड गोष्ट आहे असे सांगत सुभेदार पुढे म्हणाल्या, “आम्ही विनोद शिकलो, विनोद करतो, विनोद जगतो यामागे आमच्या गुरुजनांचे काम मोठे आहे. विनोद हा अवखळ, बालिश, खट्याळ, विसरभोळा, अपमान करणारा, आंबट -गोड असतो पण तो परंपरेने तुमच्या पर्यंत येत असतो हे ही लक्षात घ्यायला हवे. आपला विनोद आपल्या विनोदी संस्कृतीमध्ये पेरला गेला आहे.”
विनोद करताना किंवा कोणताही अभिनय करताना तुमची देहबोली महत्त्वाची असून तुमच्या कामात लेखक आणि दिग्दर्शक या दोहोंचाही मोठा वाटा आहे. नाटक, मालिका, चित्रपट तिन्ही प्रकारांमध्ये आव्हाने वेगवेगळी आहेत. त्यामुळे या प्रकारांमध्ये काम करीत असताना कलाकाराला तांत्रिक ज्ञान असणे देखील गरजेचे झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विनोदी कलाकार म्हणून ओळख मिळाली असली तरी या प्रकारात मी गेली ११ वर्षे काम करीत आहे. आपल्या 'कम्फर्ट ' झोनमध्येही कधीकधी आपल्याला 'डिस्कम्फर्ट ' येतोच. यामधून बाहेर पडून काहीतरी नवं करायचा मी प्रयत्न करत आहे. अभिनयात बदल करायची ही उर्मी मला आतूनच आली, त्यामुळे सध्या मी मालिकेमधील खलनायिकेची भूमिका आणि चित्रपट करतीये असे सुभेदार म्हणाल्या.
आज बँकेचा हप्ता भरायला पैसे नाहीत या कारणामुळे कलाकार आत्महत्या करत आहेत. कलाकारांनी कलाकारांसाठी उभे रहायला हवे. त्यांना येणाऱ्या अडचणीमध्ये त्यांना मदत करण्यासाठी देखील निधी अर्थात फंड असायला हवा, अशी अपेक्षा सुभेदार यांनी व्यक्त केली. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रेखा यांनी केलेल्या कौतुकाच्या आठवणी देखील विशाखा सुभेदार यांनी जागविल्या.
आज महिला केंद्री कथा लिहिल्या जात आहे याचा आनंद असल्याचे सांगत रंजना बाई, निर्मिती सावंत, भक्ती बर्वे, रिमा लागू, मुक्ता बर्वे यांच्या सारखे काम करायची इच्छा विशाख सुभेदार यांनी व्यक्त केली.
माझ्या पिढीने राम नगरकर यांच्याकडून विनोदाचे बाळकडू घेतले असे सांगत लेखक सचिन मोटे म्हणाले की, “माझ्या लहानपणी साताऱ्यात असताना माझी आई शाहू कलामंदिरमध्ये रामनगरीचे प्रयोग बघायला आम्हाला घेऊन जायची. माझ्यावर विनोदाचे पहिले संस्कार तिथे झाले. राम नगरकर यांचा विनोद मोकळा ढाकळा, स्वच्छ, निर्मळ असायचा.
त्या काळात काही दलित आत्मचरित्रांनी भूकंप आणला होता. राम नगरकरांनी तोच भूकंप, तोच धक्का हसतहसत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला. त्यांच्याविषयी कायम आपलेपणा वाटायचा. त्यांनी त्यांचा संघर्ष, आयुष्य हसत हसत विनोदाच्या माध्यमातून मोकळेपणाने सर्वांसमोर मांडले. आज त्यांनी केले तसे विनोद सर्वसामान्य प्रेक्षक ऐकून घेणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यासारखे विनोद आज करता येणार नाहीत.”
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, “विनोदी कलावंतांकडे केवळ आपले रंजन करणारी माणसे म्हणून बघितले जायचे. मात्र, कोविडनंतर विनोदी कलाकारांचे महत्त्व वाढले. ताण विरहित जगणे किती महत्त्वाचे आहे, हे या बिकट परिस्थितीत सर्वांच्याच लक्षात आले. त्यामुळे आमचे सुख दुःख वाटून घेणारा कलावंत अशी विनोदी कलाकारांची नवी ओळख निर्माण झाली.” विशाखा ही अनेक भूमिका तन्मयतेने करणारी परिपूर्ण अभिनेत्री आहे. नजीकच्या भविष्यात ती आणखी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका मांडेल असा विश्वास गोस्वामी यांनी व्यक्त केला.
राम नगरकर पुरस्कार एका महिला विनोदी कलाकाराला द्यावा ही वंदन यांची इच्छा होती. काही महिन्यांपूर्वी ते गेल्यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती इच्छा पूर्ण झाली याचे समाधान डॉ वैजयंती नगरकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राम नगरकर यांच्या कन्या मंदा हेगडे यांनी राम नगरकर यांचा लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या ‘रामनगरी’चा काही भाग सादर केला.
प्रतिभा देशपांडे यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. डॉ वैजयंती वंदन नगरकर यांनी प्रास्ताविक केले. संध्या नगरकर यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments