महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर

पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक श्री. प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी


पुणे : राज्यातील महावितरणच्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला आता सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या वीजपुरवठ्यासाठी त्याच परिसरात सौर प्रकल्प उभारून ‘हरित ऊर्जे’ची निर्मिती करण्यात येणार आहे.

दरम्यान विद्युत वाहनाच्या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करणारा पहिला प्रकल्प पुण्यातील गणेशखिंड येथे साकारत आहे. या चार्जिंग स्टेशनसाठी उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाची महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी शनिवारी (दि. ५) पाहणी केली.

महावितरणकडून अनेक उपकेंद्र व प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. यात पुणे परिमंडलामध्ये शहरी व ग्रामीण भागात एकूण १८ ठिकाणी विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाले आहेत. या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेतून वीजपुरवठा करण्यासाठी आता चार्जिंग स्टेशनलगतच्या इमारतीवर किंवा खुल्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’ इमारतीच्या छतावर ६० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम निविदा प्रक्रियेनंतर सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पातून दरमहा निर्माण होणाऱ्या सुमारे ७ हजार २०० युनिट विजेचा ‘प्रकाशभवन’ परिसरातील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला पुरवठा करण्यात येईल.

संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाची तांत्रिक पाहणी केली. तसेच इतर चार्जिंग स्टेशन्ससाठी सौर ऊर्जा निर्मितीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच हा सौर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री संजीव राठोड, अनिल गेडाम, अमित कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांची उपस्थिती होती.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – ‘पुणे परिमंडल अंतर्गत महावितरणने कार्यान्वित केलेल्या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेतून वीजपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून १८ पैकी जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे’.

Post a Comment

0 Comments