निर्माणाधित आणि पहिल्यांदाच होणाऱ्या गृहविक्रीत देशातील ७ मेट्रो शहरांमध्ये पुणे आघाडीवर
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने ‘पुणे हाऊसिंग रिपोर्ट २०२३’ चे अनावरण
पुणे : बांधकाम व्यवसाय क्षेत्रात सातत्याने प्रगती करणारे तरीही देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत परवडणारे शहर म्हणून ओळख असलेले पुणे हे शहर २०१९ च्या तुलनेत २०२३ या वर्षांत देशातील सर्वांत वेगाने वाढणारे रिअल इस्टेट मार्केट म्हणून समोर आले आहे.
निर्माणाधित घरांच्या विक्रीसोबत पहिल्यांदा होणाऱ्या गृहविक्रीत देशभरातील महत्त्वाच्या ७ मेट्रो शहरांना पुण्याने मागे टाकले आहे. याबरोबरच २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये पुणे रिअल इस्टेट मार्केटची वाढ ही तब्बल ४५ टक्के इतकी झाली असल्याचे पुणे हाऊसिंग रिपोर्ट २०२३ या अहवालाद्वारे समोर आले आहे.
कॅम्प परिसरातील न्युक्लिअस मॉल येथे क्रेडाई पुणे मेट्रोच्या कार्यालयातील रामकुमार राठी सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या सदस्य सहाय्यता बैठकीत (मेंबर असिस्टंस मिटिंग) क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने पुणे हाऊसिंग रिपोर्ट २०२३ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी २०२३ मधील पुणे शहरातील रिअल इस्टेट मार्केटशी संबंधित अनेकविध विषयांवर चर्चा झाली.
सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता व डेटा अॅनालिस्ट राहुल अजमेरा यांनी हा अहवाल सर्वांसमोर मांडला. क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव अश्विन त्रिमल, जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर, व्यवस्थापकीय समिती सदस्य पुनीत ओसवाल, अभिषेक भटेवरा आणि कपिल त्रिमल क्रेडाई पुणे मेट्रोचे १०० हून अधिक सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे म्हणाले, “सीआरई मॅट्रिक्ससोबत रिअल इस्टेट हाऊसिंग संदर्भातील पुणे हाऊसिंग रिपोर्ट २०२३ हा आणखी एक अहवाल सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आयजीआर डेटा, महारेरा आणि सीआरई मॅट्रिक्ससह आमच्या टीमने वास्तविक प्रकल्पाच्या ठिकाणाहून एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे, ही जमेची बाजू आहे.
आमच्या सदस्यांना बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेत त्यांच्या प्रकल्पांमध्ये या माहितीचा समावेश करणे याद्वारे शक्य होईल. या अहवालाद्वारे विक्रीसोबतच पुणे विभाग हा आपली बाजारपेठ आणखी मजबूत करीत आहे, ही आम्हा सर्वांसाठी सकारात्मक बाब आहे.”
बांधकाम व्यवसाय क्षेत्रात पुणे विभागाचा होत असलेला गतीशील विकास, वाढते बांधकाम प्रकल्प यांमुळे विभागाचे स्थान हे या क्षेत्रात महत्त्वाचे म्हणून समोर येत आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचे झालेले उद्घाटन आणि होत असलेला गतीशील विकास, रिंगरोडची होत असलेली अंमलबजावणी या गोष्टींमुळे पुण्यातील बांधकाम व्यवसाय क्षेत्राला आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळत आहे.
यामध्ये व्यावसायिक, भागधारक, सरकारी अधिकारी आणि नागरिक हे देखील या क्षेत्राच्या होत असलेल्या भरभराटीमध्ये महत्त्वाचे योगदान देत असल्याची बाब देखील यामध्ये महत्त्वाची असल्याचे मत नाईकनवरे यांनी मांडले.
देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत तरुण गृहखरेदीदारांची पसंती ही पुणे विभागाला आहे याकडे लक्ष वेधत रणजीत नाईकनवरे म्हणाले की, “शैक्षण, वाहनउद्योग, माहिती- तंत्रज्ञान क्षेत्राचा पुण्यातील बांधकाम व्यवसायाला फायदा होत आहे. यासोबतच पुणे शहरातील उपलब्ध असलेल्या पायाभूत सोयीसुविधा, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, नोकरीच्या अनेकविध संधी, शैक्षणिक संस्था, पूरक हवामान या गोष्टी देखील युवक गृहखरेदीदारांना आकर्षित करीत आहेत.”
यावेळी बोलताना सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता म्हणाले, “देशातील महानगरांचा विचार केल्यास २०२३ मध्ये पुणे विभागाने सर्वाधिक म्हणजेच तब्बल ८९,३४७ घरांची विक्री केली आहे. पुणे गृहनिर्माण बाजाराच्या वाढीची कहाणी नुकतीच सुरू झाली आहे, असे आपल्याला यावरून म्हणता येईल. नजीकच्या भविष्यात पुणे लवकरच १ लाख घरांची विक्री करेल असा माझा अंदाज आहे.
पुणे हाऊसिंग अहवालातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –
- २०२३ साली पुण्याने ५७,४१२ कोटी रुपयांच्या ८९,३४७ निर्माणाधित व पहिल्यांदा खरेदी करण्यात येणाऱ्या घरांची विक्री केली. आजवर पुणे विभागात झालेली ही सर्वाधिक विक्री आहे.
- २०१९ साली पुणे विभागात झालेली गृहखरेदी ही २९,००० कोटी रुपयांची होती तर २०२३ मधील घरांची विक्री ही ५७,४१२ कोटी रुपये इतकी आहे. मागील पाच वर्षांत पुणे विभागाचे रिअल इस्टेट मार्केट हे दुपट्ट प्रमाणात वाढले आहे, असे आपल्याला म्हणता येईल.
- १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत मागील ५ वर्षांत चार पटीने वाढ झाली आहे.
- घर खरेदीदारांचा विचार केल्यास ४५% गृहखरेदीदार हे २५ ते ३५ या वयोगटातील आहेत. देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत २५ ते ३५ वयोगटातील तरुण गृहखरेदीदारांची पसंती ही पुणे विभागाला आहे.
- २०२३ मध्ये घरांची सरासरी किंमत ही ६४ लाख रुपये इतकी आहे.
- घरांचा आकार आणि किंमत वाढत असली तरीही संपूर्ण देशात आजही पुणे शहर हे इतर मेट्रो शहरांमध्ये परवडणाऱ्या शहरांच्या यादीतील आपले स्थान टिकवून आहे.
- देशातील महत्त्वाच्या शहरांशी तुलना केल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचे रिअल इस्टेट मार्केटमध्ये असलेले योगदान हे २०% इतके आहे.
- इतर शहरांच्या तुलनेत पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागात एकूण ८९०,३४७ घरांची विक्री झाली असून इतर शहरांमध्ये ठाणे + कल्याण- डोंबिवली महानगरपालिका + पालघरमध्ये ८५,०००, बंगळूरूमध्ये ६३,९८०, दिल्ली - एनसीआरमध्ये ६५,६२५, हैदराबादमध्ये ६१,७१५, मुंबई शहरामध्ये ४४,००५ आणि चेन्नईमध्ये २१,६३० घरांची विक्री झाली आहे.
- पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराचा उत्तर पश्चिम भाग (बाणेर- बालेवाडी- हिंजेवाडी- वाकड- महाळुंगे) हा एकूण मार्केट उत्पन्नाच्या ६०% इतका आहे. या भागात ७० लाखांपासून १ कोटी रुपये किंमतीची घरे घेण्याचे प्रमाण हे मागील ५ वर्षांत ५ पटीने वाढले आहे. याबरोबरच १ कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या घरांची संख्याही आता ५ पटीने वाढली आहे, हे विशेष.
0 Comments