ई-स्पोर्ट्स आणि गेम डेव्हलपमेंटमध्ये अधिक रोजगार निर्माण होण्याची आशा

सीआयआयचे अध्यक्ष आर. दिनेश यांचे मत


पुणे : अत्यंत वेगाने वाढत असलेल्या बाजारपेठेत बौद्धिक संपदा क्षेत्रात नवीन वाटा चोखाळून ईस्पोर्ट्स आणि गेम डेव्हलपमेंट क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण करण्याची मोठी क्षमता आहे, असे प्रतिपादन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (सीआयआय) अध्यक्ष आर. दिनेश यांनी केले.

पुण्यात १४ ते १६ मार्च २०२४  दरम्यान पार पडलेल्या सहाव्या आवृत्तीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी या विस्तारत असलेल्या क्षेत्राचे महत्त्व विशद करून येत्या काळात त्यामध्ये प्रचंड वाढ होण्याची भविष्यवाणी केली. व्हिडिओ गेम आणि ईस्पोर्ट्स क्षेत्राच्या बदलत्या  प्रवासाची माहिती देऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे महत्त्व याबद्दल त्यांनी विवेचन केले. 

यंदाची आवृत्ती ही आजवरची सर्वात मोठी आवृत्ती ठरली. यात १० देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ७० प्रदर्शकांनी भाग घेतला. यात इंडोनेशियाने अतिथी देश म्हणून पदार्पण केले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी (आयडीजीएस) यांनी संयुक्तरित्या या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इन्व्हेस्ट इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि मीडिया एंटरटेनमेंट स्किल कौन्सिल यांनी त्याला पाठबळ दिले होते.उद्योगाच्या जबाबदारीबद्दल बोलताना सीआयआयचे महासंचालक श्री. चंद्रजीत बॅनर्जी यांनी जबाबदार धोरणात्मक चौकटीचा आग्रह प्रतिपादन केला. देशी कंपन्यांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी जागतिक व देशी कंपन्यांमध्ये सहकाऱ्याला प्रोत्साहन द्यायला हवे, असे ते म्हणाले.

जागतिक व्हिडिओ गेम बाजारपेठ ही १८००० कोटी डॉलरची असून चित्रपट आणि माध्यम मनोरंजन उद्योगांना तिने मागे टाकल्याचा अंदाज आहे. ही बाजारपेठ २०३० पर्यंत ६६,५०० कोटी डॉलरची होण्याचा अंदाज आहे. यात लक्षणीय वाटा मिळविण्याची संधी भारताला आहे. सध्या भारतीय गेमिंग क्षेत्राचा या बाजारपेठेतील वाटा १ टक्य्यांपेक्षाही कमी असून त्याच्यामध्ये  विस्ताराची प्रचंड मोठी क्षमता आहे.

गेमिंग इंडस्ट्रीसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येण्यासाठी पुण्याचे महत्त्व अधोरेखित करताना इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीचे (आयडीजीएस) अध्यक्ष श्री. राजन नवानी यांनी शहरातील वाढती आयटी प्रतिभा तसेच आशय निर्माते आणि निर्मितीशील उद्योगांना आधार देणाऱ्या व्यवसायांमधील क्षमता यावर भर दिला. खास भारतीय ठसा असलेला देशी आशय आणण्यासाठी पुण्यासारख्या व्यासपीठाचा वापर करायला हवा. या क्षेत्राच्या वाढीला गती द्यायला हवी तसेच एआर आणि व्हीआर यासारख्या इमर्सिव्ह तंत्रज्ञानाचा अंगीकार करायला हवा, असे नवानी म्हणाले. 

Post a Comment

0 Comments