राज्यसभेतील क्राॅस वोटिंग ते हिमाचलातील सत्तासंघर्षात काॅर्पोरेट्सची भूमिका
संपादक, WebNews24
पुणे : भारतातील सत्ताकारणाच्या नसानसांत आता भांडवलशाही आणि काॅर्पोरेटशाहीचे विष पूर्णपणे भिनले आहे, सांगण्यासाठी कोणाही अर्थतज्ञाची गरज उरली नाही. कारण पडद्याआडून सत्तासंघर्षाचे खेळ करण्याचे काम केंद्रीय सत्ता आणि भारतातील काॅर्पोरेटशाही करीत आहे हे एव्हाना सूर्यप्रकाशाएव्हढे स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्रात पावणेदोन वर्षांपूर्वी झालेला राजकीय भूकंप असो की, नुकताच हिमाचलात हेलकावे घेत असलेले सत्तासिंहासन असो. सगळ्यांच्या मागे भारतीय काॅर्पोरेट्सचा हात असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. विशेष आणि गंभीर बाब ही की, या काॅर्पोरेटशाहीच्या पंक्तीत सर्वांत पहिल्या स्थानावर बसले आहेत ते गौतम अदानी आणि त्यांच्या दिमतीला आहे ती केंद्रीय सत्ता.
गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छुपे गठबंधन पौर्णिमेचा चंद्र जसा लख्खपणे प्रकाशावा, असे आहेत. या सत्तांधतेच्या घाणेरड्या खेळात प्रत्येक वेळी काॅर्पोरेटशाहीचा जो काळा चेहरा समोर येतो, त्यातही प्रत्येक वेळी अदानी यांचाच चेहरा दिसतो, याला योगायोगा नक्कीच म्हणता येणार नाही.
खरेतर ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तासीन झाले, त्याच दिवशी हे सरकार गौतम अदानी यांच्यासाठी बाटलीतील जिन्न बनले होते. अदानी यांनी कोणताही आदेश करायचा की त्या आदेशाच्या आधीच मोदी सरकार आपल्या धोरणांमध्ये असा काही बदल करते की, त्यातून एक घबाड नफा हा अदानी यांना होतोच होतो.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि धारावी पुनर्विकासाचे काम अदानी यांना मिळणे हा निव्वळ योगायोगच आहे, अशी भाबडी समजूत ज्यांची आहे, (खास करून अंधभक्त) ते मुर्खांच्या नंदनवनात सुखेनैंव नांदत आहेत, असे म्हणणे धाडसाचे अजिबात ठरणार नाही.
भांडवली सत्तापालथीसाठी देवेंद्र फडणविसांचा `रात्रीस खेळ चाले` चा अध्याय त्यांच्यात सुविद्य पत्नी तसेच गंधर्वगायनासही ओशाळा वाटावा, एव्हढ्या `सुरेल` व `गोड गळ्या`च्या गायिका अमृता वहिनींनी उलगडून दाखवला होता. आता खुद्द पत्नीनेच पितळ उघडं पाडल्यानंतर त्यावर काही खुलासा करणे किंवा `अध्यक्ष महोदय, हे विधान धादांत खोटे आहे` असे म्हणण्याचे धाडस हे कोणाही अस्सल भारतीय नवऱ्याचे कधीही होणे नाही. त्यामुळे फडणविसांनी यांना गपगुमान आपल्या पत्नीच्या आंतरराष्ट्रीय खुलाश्यास होकारार्थी मान डोलवावी लागली होती, हा भाग अलाहिदा.
असो, येथे मुद्दा हा महाराष्ट्राचा नाहीच. सध्याचा गरम मुद्दा आहे तो हिमाचलाचा. दोन दिवसांपूर्वी देशभरात राज्यसभेचा रणसंग्राम पार पडला. या रणसंग्रामात अनेक ठिकाणी आमदारांनी दरवर्षीप्रमाणे क्राॅस व्होटिंग करण्याचे पातक अत्यंत हिरीरीने पार पाडले. दक्षिणेतील कर्नाटकापासून ते उत्तरेतील हिमाचलापर्यंत क्राॅस वोटिंगची अशी काही सुनामी आली की, त्यातून चक्क हिमाचलातील काँग्रेसच्या सत्तेचे सिंहासनच जणू थरथरायला लागले. क्राॅस वोटिंगच्या या भूकंपामुळे काँग्रेसच्या सत्तेच्या गडाला चक्क तडे गेले.
सत्तापिपासूपणाची आपली तहान भागवण्यासाठी चातकासारखी चोच वर करून बसलेला भाजप ही संधी दवडेलच कसा? मग भाजपने या वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी निवडून आलेली सरकारे उलथून टाकण्याच्या या गटारगंगीय प्रवाहात भाजपने अनेकदा आपले हात धुवून घेतलेले आहेच. अर्थात, भाजपला ती गटारगंगा वाटत नाही, हा त्यांच्या दृष्टिकोनातील उदात्तपणाच आहे, असे थोडावेळ जरी मान्य केले तरी इतर राज्यांसारखी स्थिती हिमाचलात दिसून येत नाही.
दरम्यान, भाजप एकीकडे सत्तातूर झाली खरी, परंतु हिमाचलातील सत्तेचे अंतिम गंतव्य अजून खूप लांब आहे आणि या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. शिवाय भाजपकडे काही अंशात झुकलेल्या काँग्रेसच्या आमदारांचा लोलक पुन्हा काँग्रेसकडे झुकणारच नाही, याचीही शाश्वती नाही. परंतु सत्तांधता एकदा छाताडावर बसली की, मग कायदेशीर बाबी आणि संख्याबळाच्या अडथळ्यांचा विचार करतो कोण, अशी स्थिती भाजपची आहे.
या सर्व धबडग्यात काँग्रेसकडून उशिरा का होईना परंतु काँग्रेसनेही जोरदार हालचाली सुरू केल्या. हिंदी सिनेमामध्ये ज्याप्रमाणे अगदी शेवटी पोलिसांची अचानक एन्ट्री होते, तशी एन्ट्री नेहमीप्रमाणे काँग्रेसने केली. अर्थात आतापर्यंत काँग्रेसची एन्ट्री होईपर्यंत सगळी सूत्रे काँग्रेसच्या हातून गेलेली असायची. परंतु येथे तशी स्थिती नाही.
आता सर्वांत महत्वाचा मुद्दा हा आहे की, या सर्व घटनाक्रमामागे काॅर्पोरेट्सची घाणेरडी खेळी आहे तरी कशी? तर भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या `आंख का तारा` असलेल्या अदानी यांच्या हिमाचलात मोठ्या प्रमाणात सफरचंदाच्या बागा आहेत. शिवाय त्यांच्या सिमेंट फॅक्टरीदेखील आहेत. आता हे अदानी महाशय संपूर्ण देशाला आपल्याला बापाची मालमत्ता समजून प्रत्येक ठिकाणी खोदकाम, लूट-खसोट करण्याचा प्रयत्न करीतच असतात. तो कित्ता ते हिमाचलात गिरवणार नाहीत तर मग ते अदानीच कसले.
काही महिन्यांपूर्वी जेंव्हा हिमाचलात नैसर्गिक संकटाने थैमान घेतले होते, त्यात राज्याचे मोठे नुकसान झाले. त्या वेळी केंद्राच्या मदतीवर अवलंबून न राहता तेथील मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आत्मनिर्भर होत तेथील संकटाचा सामना केला. त्यात त्यांनी चक्क सिमेंटवर १० टक्के टॅक्सही वाढवून दिला. या घटनेमुळे अदनींचे पित्त खवळणे अगदीच स्वाभाविक. तसेच आपल्या मित्रास अशाप्रकारे त्रास देणाऱ्यास केंद्रीय सत्तेकडून आव्हान न मिळणे अगदीच अशक्य.
या स्थितीत तेथील सुक्खू यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी महाराष्ट्रासारखाच सत्तांधतेचा नागडा खेळ चालला आणि काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये पडद्यामागे हालचाली वाढल्या. सुक्खू यांनी अनेक लोकोपयोगी निर्णयदेखील गेल्या काही काळात घेतले होते, ज्यामुळे देशभरातील बऱ्याच काॅर्पोरेट्सना पोटशूळ उठला होता. त्यामुळेच हा सर्व `खेला` करण्यात आला आहे.
या संपूर्ण स्थितीवरून स्पष्ट आहे की, भारतीय सत्ताकारणाच्या क्षेत्रात काॅर्पोरेट्सची घुसखोरी ही आता एकीकडे विरोधी पक्षांच्या आणि दुसरीकडे जनतेच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे भारतीय सत्ताकारणाला हा जो काॅर्पोरेटीकरणाचा रोग झालेला आहे, त्यावर एखादा जालीम इलाज करणे गरजेचे आहे.
मो. 9763952172
email - deshsudhir2012@gmail.com
0 Comments