सर्वांगीण समतोल हे योगचे सूत्र – डॉ ईश्वर बसवरेड्डी

महाराष्ट्रीय मंडळाच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमीत्त आयोजित दोन दिवसीय 

आंतरराष्ट्रीय योग परिषदेचा समारोप


पुणे : शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सांभाळीत सर्वांगीण समतोल साधणे हे खऱ्या अर्थाने योगचे सूत्र असल्याचे प्रतिपादन मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे संस्थापक आणि माजी संचालक डॉ. ईश्वर बसवरेड्डी यांनी केले. पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या समारोपाप्रसंगी डॉ. बसवरेड्डी बोलत होते.

महाराष्ट्रीय मंडळाच्या शतक महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून मंडळाच्या गुलटेकडी येथील परिसरातील सकल ललित कलाघर येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनावणे, महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सरचिटणीस रोहन दामले, परिषदेचे अध्यक्ष डॉ सोपान कांगणे, निमंत्रक प्रो उज्वला राजे व डॉ पल्लवी कव्हाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.      

गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या परिसरातील सकल ललित कलाघर येथे ही दोन दिवसीय परिषद संपन्न झाली. ‘मॅट टू माईंड’ ही परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. सदर परिषदेसाठी योग व आयुर्वेदा प्रबोधिनी, फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, सेंटर काऊन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी आणि अर्बन रुरल मॅनेजमेंट एम्पॉवमेंट एस्टॅब्लिशमेंट अर्थात उर्मी यांचे विशेष सहकार्य लाभले होते.

परिषदेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांसोबत योग शिक्षक, प्रशिक्षक, विद्यार्थी, संशोधक यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. या दोन दिवसीय परिषदेत देशभरातून ५०० हून अधिक इच्छुकांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी बीजभाषणे, कार्यशाळा, व्याख्याने यांसोबतच योग या विषयाशी संबंधित १८ पेपर्स आणि ५० शोधनिबंध देखील सादर झाले.

मागील १० वर्षांमध्ये जगभरात योग हे लोकप्रिय होताना पहायला मिळत आहे, यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे सांगत डॉ. बसवरेड्डी म्हणाले, “आज जगभरात २७ कोटींहून अधिक नागरिक हे दैनंदिन जीवनात योगाभ्यास करतात. योग या विषयाच्या विविध शाखा आणि प्रकार असून विविधतेचे दर्शन आपल्याला योगमध्येही दिसून येते. विविधतेत समतोलाचे सूत्र सांगणारा योग हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज आपला देश हा योग मुळेच विश्वगुरुपदी विराजमान झाला आहे. आज जगाने आपला योग आणि आपली संस्कृती मान्य केली आहे, ही सर्व देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.”

जगभरात योगचा झालेला प्रसार हा खरेतर भारतीय म्हणून आपली जबाबदारी वाढविणारा असून याचे भविष्य आता तरुण पिढीच्या हाती आहे. जेव्हा एक व्यक्ती आणखी दुसऱ्या व्यक्तीला योग शिकविते तेव्हा ती योगची भारतीय परंपरा पुढे नेत असते, असे मला वाटते. मात्र हे करीत असताना स्वत: देखील प्रगती करणे आणि स्वत:च्या ज्ञानात वेळोवेळी भर घालून घेणे हे महत्वाचे आहे, असेही डॉ बसवरेड्डी यांनी सांगितले.


योगद्वारे आपण आपल्या श्वासावर आणि पर्यायाने स्वत:वर नियंत्रण ठेवायला शिकवतो त्यामुळे योग ही अनुभविण्याची गोष्ट आहे असे मला वाटते. केंद्र सरकारच्या पुढाकाराने अंमलात येत असलेल्या नव्या शिक्षण धोरणामध्येही आता योग हा विषय आणखी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरु असून नजीकच्या भविष्यात ४५ लाख माध्यमिक विद्यार्थ्यांना योग शिकविण्याचे उद्दिष्ट्य आहे. यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची गरज वाढणार आहे याकडे डॉ सोनावणे यांनी लक्ष वेधले.


समारोप सत्राच्या आधी डॉ ईश्वर बसवरेड्डी यांनी ‘मॅट टू माईंड’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले.


 अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, रोहन दामले यांनी या परिषदेच्या संकल्पनेबद्दल माहिती दिली. प्रो उज्वला राजे यांनी दोन दिवसीय परिषदेचा आढावा घेतला तर डॉ पल्लवी कव्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments