विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची उपस्थिती
पुणे : अक्षर मानव व्यापार विभागाच्या माध्यमातून आपापल्या व्यवसायाला एक नवी उंची प्रदान करू व हातात हात घालून केवळ एक माणूस म्हणून जगताना प्रामाणिकपणे एकमेकांच्या व्यवसायाला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करीत राहू, असा संकल्प अक्षर मानवच्या पहिल्या-वहिल्या व्यापार अड्डा कार्यक्रमात उपस्थितांनी व्यक्त केला.
व्यवसाय आणि व्यापाराला वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने अक्षर मानव व्यापार विभागाच्या वतीने प्रजासत्ताकदिनी व्यापार अड्डा कार्यक्रम उत्साहात पार पडला. धानोरी येथील बापट मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विविध व्यावसायिकांनी सामिल होऊन आपापल्या अनुभवांचे आणि व्यावसायिक ज्ञानाचे आदानप्रदान केले. आता दर महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात अशाप्रकारचा व्यापार अड्डा आयोजित केला जाणार आहे.
अक्षर मानव व्यापार विभागाचे राज्य अध्यक्ष परेश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या व्यापार अड्डा कार्यक्रमाला अक्षर मानव व्यापार विभागाचे कोषाध्यक्ष सागर थोरात, अक्षर मानव व्यापार विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अंबादास वाणी, समर्थ प्रो-हेल्थकेअरचे संस्थापक डाॅ. प्रमोद हिबारे यांच्यासह समर्थ प्रो चे नॅशनल प्रमोटर सुहास देशमुख, महेश पाटणकर, अक्षर मानव व्यापार विभागाअंतर्गत अक्षर मानव पीआर मीडियाचे राज्य अध्यक्ष सुधीर देशमुख, अॅबॅकस शिक्षिका नीलमताई साळवे, नितीन साळवे, अक्षर मानव पुणे जिल्हा कार्यवाह तथा डिजिटल मार्केटिंग तज्ञ किरण सोनवणे, हितेश जगनाड, ब्युटिशियन शीलाताई डांगे, बापट हाॅस्पिटलचे रानू गोपाल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना परेश गांधी यांनी अक्षर मानव व्यापार विभाग व व्यापार अड्ड्याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अक्षर मानव व्यापार विभाग हा आपल्या सदस्य व्यावसायिक सदस्यांच्या भरभराटीसाठी सातत्याने कार्यरत राहतो. लवकरच अक्षर मानवशी निगडित व्यावसायिकांसाठी ई-दुकान सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच विविध प्रकारच्या व्यावसायिक मूल्यांबाबतही मार्गदर्शन दिले.
व्यापार अड्डा कार्यक्रमात सहभागी सर्वांनी आपापल्या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती या वेळी प्रदान केली. डाॅ. प्रमोद हिबारे यांनी सांगितले की, अक्षर मानवचा हा उपक्रम अत्यंत चंगला असून, या माध्यमातून अक्षर मानवशी जोडल्या गेलेल्या व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. त्यांनी या वेळी डायरेक्ट मार्केटिंग आणि नेटवर्क मार्केटिंगच्या विविध पद्धती उलगडून दाखवल्या.
सुधीर देशमुख यांनी प्रत्येक व्यवसायाला लागणाऱ्या प्रसिद्धीसाठी अक्षर मानव पीआर मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग कशाप्रकारे मदत करू शकते, याविषयी सविस्तर माहिती दिली. अंबादास वाणी यांनी अक्षर मानवच्या पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमांची या वेळी माहिती दिली. किरण सोनवणे यांनी डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईनिंगचा वापर करून व्यवसाय वृद्धी कशी करावी, याबाबत माहिती दिली.
नीलम सोनवणे यांनी अॅबॅकस संदर्भात माहिती दिली. शीला डांगे यांनी ब्युटी प्राॅडक्ट आणि ब्युटिशीयनच्या व्यवसायाची माहिती सांगितली. सागर थोरात यांनी आपल्या महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, शासकीय मान्यतेची कागदपत्रे कसी प्राप्त करावी व आॅनलाईन विविध कागदपत्रांची प्राप्ती कशी करावी, हे सांगितले.
पुढील महिन्यातील व्यापारी अड्डा यापेक्षा जास्त यशस्वी करण्याचा संकल्प घेऊन व्यापार अड्डा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments