एमआयटी-एडीटीमध्ये चांद्रयान-३ च्या लँडिंगचा नेत्रदीपक सोहळा संपन्न
पुणे : प्रचंड शिगेला पोहोचलेली उत्सुकता... चंद्राकडे लागलेले विद्यार्थ्यांचे डोळे...उत्साहाला उधाण... अन् पाहता-पाहता चांद्रयान-३ चे चंद्रावर लँडिंग... टाळ्या... शिट्ट्या... जल्लोष... आनंद... असे प्रचंड उत्साही व आशादायी चित्र बुधवार २३ आॅगस्ट रोजी एमआयटी-एडीटी विद्यापीठात दिसून आले.
या ठिकाणी प्रत्यक्षपणे विक्रम लँडरचे लँडिंग पाहताना विद्यार्थ्यांचा उत्साह आणि जल्लोष अक्षरशः ओसंडून वाहत होता. चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग एक आगळावेगळा समारोह या ठिकाणी पार पडला. यावेळी जवळपास ३०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. `लगर फाल्कन एरो क्लब` आणि विद्यार्थी व्यवहार व कल्याण विभागाच्या सहकार्याने हे लाईव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुनील डिंगरे, विद्यार्थी व्यवहार व कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुराज भोयर, फॅकल्टी मेंटॉर प्रा.कृष्णा जाधव, आणि एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमादरम्यान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे डीन, प्राध्यापक उपस्थित होते. यामध्ये डाॅ. अतुल पाटील, डाॅ. अमोल देशमुख, डाॅ. धनंजय धोत्रे, प्रा. पद्माकर फड, डाॅ. उल्हास मालवडे, डाॅ. स्वप्नील शिरसाठ, प्रा. राहुल ठाकरे उपस्थित होते.
लाँचिंग ते लँडिंग : विद्यार्थ्यांमध्ये दिसला उत्साह
बुधवारी सकाळपासूनच एमआयटी-एडीटी विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये एक अनोखा उत्साह दिसून येत होता. मध्ये-मध्ये चांद्रयान-३ चे लँडिंग अपयशी तर होणार नाही ना, याची अनामिक भीती विद्यार्थ्यांमध्ये होती. चांद्रयान ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राकडे झेपावले होते, त्या दिवशीदेखील शेकडो विद्यार्थ्यांनी अशाचप्रकारे बसून त्या क्षणाचे सोनेरी क्षण आपल्या आशादायी डोळ्यांमध्ये साठवून ठेवले होते. आज त्यापेक्षाही जास्त उत्साह विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला.
सायंकाळी पाचच्या सुमारास सर्व विद्यार्थी राज कपुर आॅडिटोरियम मध्ये जमले. त्या ठिकाणी मोठ्या स्क्रिनवर चांद्रयान-३ चे लँडिंग सर्वजण लाईव्ह पाहत होते. जसजशी चांद्रयान लँडिंग होण्याची वेळ जवळ येत होती, तसतसा थरार वाढत चालला होता. काही दिवसांपूर्वी रशियाचे लूना-25 याच चंद्रावर धडकून नष्ट झाले होते. त्यामुळे ती स्थिती पुन्हा येऊ नये, अशी सर्वच विद्यार्थी व प्राध्यापक प्रार्थना करीत होते.
अखेर तो क्षण आला, अन् चांद्रयान-३ ने यशस्वीरित्या आपले पाऊल चंद्राच्या पृष्ठभागावर ठेवले. त्याच क्षणी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. टाळ्या... शिट्ट्या यामुळे संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचा एक आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
डाॅ. मंगेश कराड यांच्याकडून शुभेच्छा
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांना एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश कराड यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच हे अशक्यप्राय वाटणारे अभियान १०० टक्के यशस्वी केल्याबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. डाॅ. कराड म्हणाले की, दक्षिण ध्रुव स्पेस पायोनियर म्हणून भारताने आज यशाचा एक मोठा पल्ला गाठला आहे. यातून भविष्यात भारताचे सामर्थ्य जगाच्या पटलावर अधोरेखित होणार असून, भारताने महासत्ता होण्याच्या दिशेने ठोस पावले टाकल्याचे ते म्हणाले.
0 Comments