पुणे पीपल्स बँकेतर्फे ग्राहकांसाठी 'मोबाईल अ‍ॅप' आणि 'घरबसल्या कर्ज सुविधा'

पुणे पीपल्स को-आॅप बँकेच्या ग्राहकाभिमुख अभिनव सुविधांची घोषणा                          



पुणे : पुणे पीपल्स को-आॅप बँक लि., पुणे तर्फे ग्राहकांच्या सोयीकरिता मोबाईल अ‍ॅपची सुविधा करुन देण्यात येणार आहे. याशिवाय घरबसल्या इंटरनेटद्वारे कर्जासाठी आॅनलाईन अर्ज देखील करता येणार आहे. तसेच बँकेच्या २२ शाखांपैकी कोणत्याही शाखेत ग्राहक केवळ स्वत:चा एक फोटो आणि आधार कार्ड घेऊन गेल्यास नवीन खाते उघडण्याची अभिनव योजना बँकेने केली असून ग्राहकांसाठी अद्ययावत सुविधांसह २४ तास अखंड सेवा देण्याचा निर्धार बँकेने केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते यांनी दिली.

पत्रकार परिषदेला बँकेच्या उपाध्यक्ष वैशाली छाजेड, संचालक बबनराव भेगडे, सीए जर्नादन रणदिवे, श्रीधर गायकवाड, सुभाष नडे, बिपीनकुमार शहा, डॉ.रमेश सोनवणे, सुभाष गांधी, मिलिंद वाणी, निशा करपे, संजीय असवले, विश्वनाथ जाधव, स्वीकृत तज्ञ संचालिका श्वेता ढमाळ, सौरभ अमराळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार शेळके आदी उपस्थित होते.

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत ग्राहकांना आवश्यक सेवा तत्परतेने देण्यासाठी बँकेने कर्जाचे जलद वितरण, अद्ययावत मोबाईल अ‍ॅप आणि त्वरीत नवीन खाते उघडण्याची सुविधा दिली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बुधवार, दिनांक ३० आॅगस्ट रोजी बँकेच्या सर्व शाखांमध्ये या सुविधांचे लोकार्पण होणार आहे. बँकेची स्थापना सन १९५२ साली झाली. केवळ ४६ सभासदांपासून सुरु झालेल्या बँकेच्या रोपटयाचा आज वटवृक्ष झाला आहे. ग्राहकांसाठी देण्यात येणा-या सुविधांमध्ये काळानुरुप बदल होत असून बँकेच्या २२  शाखा पुणे, आळंदी, ठाणे, बेळगाव आणि परिसरात आज कार्यरत आहेत.

कर्ज वाटप प्रक्रियेमध्ये ग्राहकांना स्वत: घरबसल्या इंटरनेटद्वारे आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. याद्वारे कर्जासाठीची पात्रता देखील ग्राहकांना समजेल. तसेच ग्राहकांनी केलेल्या लॉगीन आयडी द्वारे एका पेक्षा जास्त कर्ज प्रकारांसाठी देखील अर्ज करता येईल. याशिवाय ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे एनईएफटी/आरटीजीएस, चेक बुक मागणी, एम पासबुक, मिनी स्टेटमेंट, डेबीट कार्ड लॉक करण्याची सुविधा, बँकेच्या शाखा व एटीएमची ठिकाणे यांसह अनेक सुविधा देखील या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे सहकारी बँकेमध्ये इतर बँकांप्रमाणे सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर बँकेच्या ठेवी १४०० कोटी, नफा १३ कोटी व एनपीए ०.०० टक्के

पुणे पीपल्स को-आॅप बँक लि. च्या दिनांक ३१ मार्च २०२३ अखेरच्या ठेवी १४०१ कोटी आहेत. तर, भागभांडवल २४ कोटी, राखीव निधी १८७ कोटी, कर्ज ९१८ कोटी, सीडी रेशिओ ६५.५२ टक्के, सी आरए आर १३.७७ टक्के, निव्वळ एनपीए ०.०० टक्के, नफा १३ कोटी असून लेखापरिक्षण वर्ग अ दर्जा प्राप्त आहे. तसेच २३१९ कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा बँकेने पार केला आहे. ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासोबतच आपला दर्जा देखील बँकेने टिकवून ठेवला आहे.

बँकेकडे स्वमालकीचे व स्वतंत्र डेटा सेंटर असून संपूर्ण बँक कोअर बँकिंग पद्धतीने कार्यरत आहे. बँकेचे स्वत:चे सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र, ग्राहकांना देशांतर्गत आरटीजीएस, नेफ्ट, एटीएम, टॅक्स पेमेंट, मोबाईल बँकिंग, फॉरेक्स फंड ट्रान्सफर फॉर एज्युकेशन इम्पोर्ट, दुकानदारांसाठी पीओएस मशिन सुविधा, युपीआय, आयएमपीएस, डेबिट कार्ड, एम पासबुक- मोबाईल अ‍ॅप, एसएमएस अ‍ॅलर्ट, ईमेलद्वारे बँक स्टेटमेंट आदी सुविधा, उपलब्ध आहेत. लॉकर सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आजी-आजोबा बचत खाते योजना या अंतर्गत घरपोच सेवा, १० वर्षांवरील मुला-मुलींसाठी स्वत:च्या सहीने चालवायचे आशिर्वाद बचत खाते असे नाविन्यपूर्ण उपक्रम बँक यशस्वीपणे राबवित आहे.

Post a Comment

0 Comments