शृंगार मराठीचा'मधून मराठी भाषेच्या सौंदर्याचे मनोहारी दर्शन

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची भावना; राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे

कवयित्री संगीता झिंजुरके यांचा सत्कार


पुणे : "बंधुतेचा परिसस्पर्श लाभलेल्या प्रतिभावंत कवयित्री संगीता झिंजुरके यांची 'शृंगार मराठीचा' ही काव्यरचना मराठी भाषेच्या अलौकिक सौंदर्याचे मनोहारी दर्शन घडवते. शब्दालंकाराची गुंफण असलेली ही रचना रसिकांच्या मनाला स्पर्शून जाते. विद्यापीठाच्या मराठी पुस्तकात या कवितेचा समावेश होणे हा त्यांच्या प्रतिभेचा सन्मान आहे," अशी भावना बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठीच्या पुस्तकात झिंजुरके यांच्या 'शृंगार मराठीचा' ही कविता समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचा सत्कार, तसेच कवितेवर चर्चासत्राचे आयोजिले होते. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रितम प्रकाश महाविद्यालय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.

यावेळी भगवान महावीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, बंधुता परिषदेचे सचिव प्रा. शंकर आथरे, डॉ. बंडोपंत कांबळे, पत्रकार पीतांबर लोहार, प्रा. पांडुरंग भास्कर, प्राचार्य सदाशिव कांबळे आदी उपस्थित होते.

प्रकाश रोकडे म्हणाले, "प्रत्येक नाते जपत योग्य शिक्षण आणि संस्कार यातून आपले आयुष्य घडते. आपण नात्यावर प्रेम करतो; तसेच आपल्या भाषेवरही प्रेम करणे गरजेचे आहे. त्यातूनच आपली भाषा अधिक समृद्ध होईल. मराठी भाषेच्या सौंदर्याची व्याप्ती अधोरेखित करणारी ही कविता मनामनात, घराघरात पोहोचली पाहिजे."

डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, "प्रतिभाशक्ती आणि सौंदर्यदृष्टी याचा संगम साधणारी ही कविता आहे. मराठी भाषेच्या सौंदर्याचा उलगडा समर्पक शब्दांत केला आहे. कल्पना शक्ती आणि विरामचिन्हाच्या अलंकाराने मराठी भाषेला सौंदर्याचा साज दिला आहे. त्यांच्या काव्य प्रतिभेची दखल घेतल्याचा विशेष आनंद आहे."

संगीता झिंजुरके म्हणाल्या, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात माझ्या कवितेचा समावेश होणे हा खूप मोठा सन्मान आहे. विविध टप्प्यावर मला सहकार्य करणाऱ्यांना हा सन्मान समर्पित करते. बंधुतेच्या परिवारात माझी कविता बहरत, फुलत आणि निखळ झऱ्यासारखी वाहत गेली. बंधुतेच्या परिसस्पर्शाने माझ्या कवितेचे आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले आहे."

प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ. विजय निकम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पांडुरंग भास्कर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments