एमआयटी-एडीटी विद्यापीठात 350 व्या शिवराज्यभिषेक दिनाचा दिसला उत्साह

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन

शिवरायांचे चरित्र जाणून घेऊन प्रत्येकाने आचरणात आणावे - डाॅ. मंगेश कराड


पुणे : संपूर्ण हिंदुस्थानचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेकाचा अनोखा उत्साह लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात दिसून आला.

मंगळवार दि. 6 जून रोजी येथील कॅम्पसमध्ये असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश कराड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण कॅम्पसचा परिसर दणाणून गेला होता.

6 जून 1673 रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि तमाम हिंदुस्थानात एका लाडक्या रयतेच्या राज्याचे राज्यारोहण झाले. या समारंभाला आज 350 वर्षे उलटली असली, तरी संपूर्ण महाराष्ट्रात या समारंभाचा उत्साह कुठेही कमी झाला नाही. मंगळवारी छत्रपती शिवरायांची राजधानी रायगडापासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे तो एमआयटी-एडीटी विद्यापीठातही साजरा करण्यात आला.

या वेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हारार्पण तथा पूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना डाॅ. मंगेश कराड म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि त्यातून समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांच्या उत्थानासाठी आपले जीवन खर्ची घातले. त्यांचे संस्कार आणि आदर्श कार्यापासून प्रेरणा घेऊन आपण त्यांचे विचार आपल्या अंगी बाणवणे, हेच खऱ्या अर्थाने या राजाला आजच्या दिवशी अभिवादन असेल.

या प्रसंगी विद्यापीठाचे प्रो-व्हाईस चान्सलर डाॅ. अनंत चक्रदेव, मिटकाॅमच्या संचालिका डाॅ. सुनीता कराड, रजिस्ट्रार डाॅ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डाॅ. ज्ञानदेव नीलवर्ण, स्टुडंट अफेयर्सचे असोसिएट डायरेक्टर प्रा. डाॅ. सुराज भोयर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments