खेळाडूंनी कठोर मेहनतीची तयारी ठेवावी ः सुभेदार जयसिंग पाटील
पुणे - लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या खेळाडू व संघांना एका दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षभरात विद्यापीठाअंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गुरुवार २५ मे रोजी झालेल्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूटचे वरिष्ठ बाॅक्सिंग कोच सुभेदार जयसिंग पाटील, सन्माननीय अतिथी म्हणून पतंजली योग पीठाचे महाराष्ट्र प्रभारी योगाचार्य विष्णू भुतडा, ट्र्स्काॅलर चे को-फाऊंडर आणि सीए मयूर झंवर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डाॅ. अनंत चक्रदेव, स्पोर्ट्स डायरेक्टर पद्माकर फड, स्टुडंट अफेयर्स विभागाचे असोसिएट डायरेक्टर प्रा. डाॅ. सुराज भोयर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी एमआयटी-एडीटीचा प्रयत्न
एमआयटी-एडीटी विद्यापीठा अंतर्गत चालणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येत असतात. मैदानीपासून ते बैठ्या खेळापर्यंत विविध खेळांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात. या क्रीडा स्पर्धांमधूनच विद्यार्थी पुढे राज्य व राष्ट्रीयस्तरावरील खेळांमध्ये आपले व आपल्या विद्यापीठाचे नाव उज्जवल करीत असतात. डाॅ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अॅकॅडमी या अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचे कार्य शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड आणि आॅलिम्पियन आणि अर्जून पुरस्कार प्राप्त मनोज पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनात वर्षभरात पार पडलेल्या क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना या समारंभात सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कठोर मेहनतीची तयारी ठेवावी - सुभेदार जयसिंह पाटील
या वेळी बाॅक्सिंग कोच सुभेदार जयसिंह पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला व एमआयटी-एडीटी विद्यापीठामध्ये खेळाडूंना मिळणार्या उच्चस्तरीय सुविधांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, खेळाडूंनी आपले नेहमी विजेतेपदाकडे आपले लक्ष ठेवावे व लक्ष्य निर्धारित करून ट्रेनिंग घ्यावे. यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मेहनतीमध्ये कुठेही कमी पडू नका. पराभवाने खचून जाऊ नका. पराभव झाल्यास आणखी जोमाने कामाला लागा.
योगाने वाढते शारीरिक व आत्मिक बल - विष्णू भुतडा
या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विष्णू भुतडा म्हणाले की, योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक महत्वपूर्ण देणगी आहे. योगामुळे असाध्य गोष्टीही मनुष्य साध्य करू शकतो, कारण योगामुळे शारीरिक, आत्मिक आणि आध्यात्मिक बळ मनुष्यामध्ये वृद्धिंगत होते आणि ज्याच्यामध्ये हे तीनही प्रकारचे बळ आहे, तो मनुष्य कितीही संकटे आली तर डगमगत नाही आणि जीवनात विजयी होतो.
योग आमच्यात सकारात्मकता निर्माण करतो आणि आम्हाला यशाच्या मार्गावर नेतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने खेळासोबत योगावरही भर दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यापीठाच्या स्टुडंट अफेयर्स विभागाचे असोसिएट डायरेक्टर प्रा. डाॅ. सुराज भोयर यांनी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमागील उद्देश्य स्पष्ट केला. ते म्हणाले की, भारताला क्रीडा क्षेत्रात महाशक्ती बनवण्यासाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सर्व सुविधा व प्रोत्साहन देते. या वेळी डाॅ. सुराज भोयर यांनी एमआयटी-एडीटी विद्यापीठाची प्रतिष्ठित स्पर्धा `विश्वनाथ स्पोर्ट्स मिट`संदर्भात माहिती उपस्थितांना दिली.
एमआयटी स्कूल आॅफ इंजीनियरिंग सर्वसाधारण विजेते घोषित
यानंतर विविध खेळांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये वैयक्तिक आणि सांघिक खेळातील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. 23 सुवर्ण आणि 22 रौप्य पदकांसह सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल एमआयटी स्कूल आॅफ इंजीनियरिंगला सर्वसाधारण विजेता घोषित करून त्यांना विजेतेपदाची ट्राॅफी प्रदान करण्यात आली, तर महाराष्ट्र अॅकॅडमी आॅफ नेव्हल एजुकेशन अॅण्ड ट्रेनिंगला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय या वर्षी बेस्ट स्पोर्ट्समन आॅफ द इयरचे दोन पुरस्कार देण्यात आले. यामध्ये पुरुष खेळाडूमध्ये शिवम बोराडे व महिला खेळाडूमध्ये आर्या तुपे यांना हा पुरस्कार देण्यात आला, तर रोईंग या खेळात सर्वोत्तम प्रशिक्षण दिल्याबद्दल बेस्ट कोच आॅफ द इयरचा पुरस्कार संदीप भापकर यांना प्रदान करण्यात आला.
वार्षिक क्रीडा अहवाल वाचन कॅडेट साहील जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील, प्रा. अशोक आणि प्रा. स्नेहा यांनी केले, तर कॅडेट एडविन सँथीस यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments