प्रशांत दामले, गिरीश ओक आणि सुधीर गाडगीळ यंदाच्या पुरस्काराचे मानकरी
पुणे : महाराष्ट्र चित्पावन संघाच्या वतीने परशुराम जयंतीचे औचित्य साधत प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले, अभिनेते गिरीश ओक आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांचा परशुराम पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
येत्या शनिवार दि २९ एप्रिल रोजी सायं ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतील. रुपये ११ हजार रोख, गौरवपत्र, श्री परशुरामाची मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठीच्या विनामूल्य प्रवेशिका चित्पावन संघाच्या टिळक रस्त्यावरील कार्यालयात सकाळी ११ ते सायं ७ या वेळेत तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि. २८ व २९ एप्रिल रोजी उपलब्ध असतील.पुरस्कार वितरणानंतर प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, गिरीश ओक आणि गायिका अश्विनी वझे यांसोबत गप्पा-गोष्टी आणि हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम देखील रसिकांना अनुभविता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्पावन संघाच्या कार्यवाह सुप्रिया दामले यांनी कळविली आहे.
वर्ष २००७ पासून सदर पुरस्कार देण्यात येतात. कोरोन काळात २०२०, २०२१ आणि २०२२ असे तीन वर्ष खंड पडल्याने यंदा ३ पुरस्कार देण्यात येत आहेत. याआधी बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी प्रमुख डॉ. रवींद्र मराठे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, आईबीएमचे भारतातील संचालक आदेश गोखले, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, चित्रकार रवी परांजपे, दिलीप ओक, अशोक वझे आदी मान्यवरांना श्री परशुराम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
0 Comments