रिलायन्स लिमिटेड आणि प्रतिती सेंटर फाॅर मेंटल हेल्थची भागीदारी

मानसिक आराेग्य जनजागृती व पुनर्वसनासाठी करणार प्रयत्न


पुणे : मानसिक आरोग्याबद्दल समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने रिलायन्स रिटेल लिमिटेड व प्रतिती सेंटर फाॅर मेंटल हेल्थ हे एका सामाजिक जबाबदारीतून एकत्र आले आहेत. यामध्ये मानसिक आजाराबाबतचा समाजात असलेला कलंकाची भावना कमी करणे आणि मानसिक आजारी असलेल्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे हा देखील त्यांचा उददेश आहे.

या भागीदारीनुसार औंध येथील रिलायन्स स्मार्टच्या प्रतिती दालनात मानसिक रुग्ण व प्रतिती केंद्रातील रहिवाशांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित उत्पादनांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. हे उत्पादने विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. या उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारे पैसे थेट येथील रहिवाशांना मिळतील.

त्यामुळे, त्यांना आवश्यक ते प्रोत्साहन मिळेल. साेबत त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य व आर्थिक स्थिरतेची भावना देखील निर्माण होईल. या उत्पादनांमध्ये हाताने तयार केलेले रुमाल, शॉपिंग बॅग, भरतकाम केलेले दुपट्टे, कोस्टर हे मानसिक राेग्यांचे पुनर्वसन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तयार केलेली इतर उत्पादने देखील या लॉबीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आधीच्या केंद्रामध्ये मर्यादित येणारे गि-हाईक आणि केंद्रांचे लाेकेशन लक्षात घेता, या उत्पादनांची गि-हाईकांपर्यंत पाेचण्याची क्षमता कमी हाेती. मात्र, रिलायन्स स्मार्ट सारख्या लोकप्रिय आणि उच्च दृश्यमानता क्षमता असलेल्या ठिकाणी या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री केल्याने येथील रहिवाशांनी केलेल्या कामाबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या ज्ञानातही भर पडेल.

याबाबत अधिक माहीती देताना प्रतिती च्या संस्थापक आणि संचालिका सुषुप्ती साठे म्हणाल्या आमच्या रहिवाशांना त्यांच्या कुटुंबात पुन्हा जोडणे आणि त्यांना समाजातील सक्रिय सदस्य बनवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी त्यांना एखादे कौशल्य शिकण्यासाठी प्रोत्साहित करून ते प्रदर्शित करणे आणि उपजीविकेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा देखील उददेश आहे. यातून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि स्थिरतेकडे घेउन जाता येईल.

प्रतिती येथे असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण थेरपीमुळे आम्हाला चांगले यश मिळाले आहे. यामुळे उपचार प्रक्रियेत आमच्या रहिवाशांच्या सर्जनशीलतेला आणि प्रतिभेला प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे मानसिक आरोग्याबाबत जागरुकता आणि आमच्या रहिवाशांनी प्रतिती येथे तयार केलेल्या वस्तूंना व्यासपीठ मिळाले आहे.’’

या केंद्रामध्ये स्किझोफ्रेनिया, बायपाेलर डिसाॅर्डर,आणि इतर मानसिक आजारांनी पीडित असलेले व त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे असे रहिवासी आहेत. या केंद्रात याच रहिवाशांकडून किऑस्कचे व्यवस्थापन केले जाईल. ज्यामुळे मानसिक आरोग्याभोवतीचा कलंक दूर करण्यात मदत होईल आणि त्यांचे संवाद काैशल्यदेखील वाढेल.

Post a Comment

0 Comments