श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे सद्गुरु श्री जंगली महाराज १३३ वा पुण्यतिथी उत्सव
पुणे : अविट गोडीचे राग, त्याला सप्तसुरांची साथ, तबल्याच्या थापेने निर्माण होणारे ताल आणि त्याला गायकांची सुरेल गायन साथ अशा राग आणि सुरांनी नटलेल्या ज्येष्ठ गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या संगीत मैफिलीने सद्गुरु श्री जंगली महाराज संगीत महोत्सव बहरला.
सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जंगली महाराज उत्सवामध्ये पं. शौनक अभिषेकी आणि सहकारी कलाकारांनी शास्त्रीय संगीताची सुमधुर मैफल सादर केली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे.
पं. शौनक अभिषेकी यांनी रागेश्री रागातील झुमरा खयालमधील तीन तालाने मैफिलीची सुरुवात केली. ' आयो आयो रे मेरे मतवा ' या गाण्याला तीन तालामध्ये सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पं. सुहास कामत आणि उदय कुलकर्णी यांनी साथ संगत केली.
पं. शौनक अभिषेकी यांचे विविध रागातील हरकतींचे सूर, त्याला तबला आणि संवादिनीची सुरेल साथ यामुळे जंगली महाराज मंदिराचा भक्तिमय परिसर संगीतमय झाला होता. या संगीतमय वातावरणाचा आनंद घेत प्रेक्षकही तल्लीन झाले होते.
'तरसे मोरी सारी अखिया', 'ले जा मुझे कही दूर ' या गाण्यांच्या सुरेल गायनाने मैफिल अधिकच रंगतदार झाली. 'शामसुंदर सखी सपने', दत्तगुरु सुमारे और कुछ न भावे, श्रीपाद नरसिंह चरण पर, 'अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे' अशा भक्तिमय गीतांनीही पं. शौनक अभिषेकी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
पं. शौनक अभिषेकी म्हणाले, सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर हे भक्तीने भारावलेले असते. या मंदिरामध्ये माझी संगीताची कला सादर करण्याची संधी मिळाली हे माझे मी भाग्य समजतो. भक्ती आणि संगीत यांच्या सुंदर मिलापातून नेहमीच ईश्वरी आनंद मिळत असतो.
0 Comments