खडकीतील ऑल सेंट स्कुल चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच

दहावीच्या परीक्षार्थींना होतोय उशीर


पुणे : मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील वाहतूक बोपोडी-खडकी बाजारमार्गे ऑल सेंट स्कुलजवळून वळविण्यात आल्याने मोठी वाहतूककोंडी होत असून, दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना परीक्षेला पुण्यात जाण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे किमान परीक्षा संपेपर्यंत येथील वाहतुकीचे नियोजन करावे, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

बोपोडी ते खडकी बाजार मार्गे ऑल सेंट स्कुल जवळून वाहतूक वळविण्यात आली आहे. या वाहतुकीचा फटका खडकी बाजार परिसरातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेषतः सांगवी, पिंपळे गुरव, बोपोडीतून खडकी बाजार परिसरातील लालबहादूर शास्त्री शाळा, आलेगावकर शाळा, एस.व्ही.एस. स्कुल, सेंट जोसेफ स्कुल, तसेच पुण्यात परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.

दररोज तास-दोन तास वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांना अडकून पडावे लागत आहे. त्यातच सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. 

बोपोडी ते खडकी स्टेशन दरम्यान मेट्रोचे काम वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक बोपोडीतून खडकी बाजार मार्गे वळविण्यात आली आहे. या मार्गावर किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी, तसेच झोपडपट्टीही आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते.

त्यातच शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची आणि पालकांची वर्दळ वाढली आहे. पेन्शनर ज्येष्ठ नागरिक, महिला, कंपनीतील कामगार आदी सर्वांना नित्याच्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. 

याबाबत रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचावे लागत आहे. हे टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियमन करण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments