सुमारे ११ हजार मतांनी विजय झाला निश्चित, भाजपचा गड ढासळला
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार २ मार्च रोजी पूर्ण करण्यात आली. शेवटच्या फेरीअखेर काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुमारे ११ हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. या पराभवासोबतच भाजपचा पुण्यातील एक मजबूत गड ढासळला आहे.
भाजपच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तथा भाजपकडून माजी मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुमारे १५ दिवस कसबा विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार महाविकास आघाडी व भाजपकडून करण्यात आला.
धंगेकरांच्या प्रचारासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला, तर भाजपकडूनही प्रचारासाठी बराच जोर लावण्या आला. रासनेंच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रचार केला.
गुरुवारी सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत सुरवातीपासूनच रवींद्र धंगेकर यांनी रासनेंवर आघाडी घेतली होती. धंगेकरांची आघाडी ही कमी-जास्त होत राहिली, परंतु रासने यांना कोणत्याही फेरीअखेर आघाडी मिळाली नाही. अखेर १९व्या फेरीअखेर धंगेकर हे ११ हजार मतांनी विजयी झाले.
धंगेकरांचा विजय होताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. गुलालांची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजीही केली. या विजयासोबतच काँग्रेसने अनेक दशकांनंतर भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेतला आहे.
0 Comments