पुणे-बंगलोर ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांचा २३ ला भव्य मोर्चा

शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुण्याच्या वारजे येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयावर निघणार मोर्चा


पुणे : प्रस्तावित पुणे-बंगलोर ग्रीनफिल्ड हायवेच्या कामात ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे, त्यांना योग्य तो मोबदला मिळत नसल्याचा आरोप करीत याविरोधात दि. २३ मार्च रोजी शेकडो शेतकरी पुण्यातील हायवे आॅथरिटीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील स्वतः मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला शेकापचे पुणे शहर अध्यक्ष सागर आल्हाट, शेतकरी संघर्ष समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रसाद खराडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कालेकर, अमोल बाबर,  अरविंद ओलेकर उपस्थित होते. 

कांबळे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की, हा ग्रीनफिल्ड हायवे पुणे, सातारा, सांगली या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून जाणार आहे. या जिल्ह्यांमधून जेथून हा महामार्ग जाणार आहे, त्या ठिकाणी जमीन अधिग्रहणाची सरकारची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मार्किगचे दगड लावणे सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित गावांची नावे जाहीर केली आहेत. परंतु या महामार्गासाठी अधिग्रहण करण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

कांबळे यांनी मागणी केली की, बाधित क्षेत्रातील जमिनीला एकरी २ कोटी किंवा चालू बाजार भावाच्या १० पट मोबदला देण्यात यावा, बाधित होणाऱ्या गावांतील संपूर्ण जमिनीला एक सारखा मोबदला द्यावा, बाधित जमिन फळबागेची असो किंवा कोरडवाहू, त्यावर बांधकाम असो की आणखी काही, या सर्वांसाठी चार पट नुकसान भरपाई दिली पाहिजे. ग्रीनफिल्ड हायवेवर जिथे-जिथे तालुका मार्ग, जिल्हा मार्गाचे क्राॅसिंग असेल, तिथे हायवेवर प्रवेशासाठी तरतूद करा,

या हायवेसाठी जी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे, त्या ठिकाणी २०१३ च्या भूमी अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी करा, संपादित क्षेत्राबाहेरील जमीन वापरात घेणार असाल, तर रितसर करार करून भाडेपट्ट्याने यासह इतर विविध मागण्या घेऊन हा मोर्चा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वारजे येथील कार्यालयावर धडकणार आहे.

शहीद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांच्या शहीद दिनी म्हणजे २३ मार्च रोजी हा मोर्चा वारजे येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सामिल होणार आहेत. तसेच यामध्ये जास्तीत जास्त ग्रीनफिल्ड बाधित शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कांबळे व शेकापच्या इतर पदाधिकाऱ्यांनी या वेळी केले.

Post a Comment

0 Comments