पुणे : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरु झालेल्या ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ डिझाईनच्या वतीने येत्या २८ व २९ मार्च २०२३ या दोन दिवशी डिझाईन समिटचे आयोजन केले आहे.
देश-विदेशातील डिझाईन क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञ मंडळींना एकत्र आणून या क्षेत्रातील नव्या संधी, प्रवाह, इनोव्हेशन्स व कल्पकता आदींवर या समिटमध्ये चर्चा होणार आहे. तसेच स्कुल ऑफ डिझाईनच्या मुलांनी तयार केलेल्या आकर्षक मॉडेल्सचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. स्मिता जाधव यांनी दिली.
डॉ. जाधव म्हणाल्या, "डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते या डिझाईन समिटचे उद्घाटन मंगळवारी (दि. २८) सकाळी ९.४५ वाजता डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ डिझाईनच्या ताथवडे कॅम्पसमध्ये होणार आहे.
यावेळी प्रसिद्ध प्रेरक वक्ते सय्यद असद अब्बास, डिझाईन तज्ज्ञ व मार्गदर्शक रिखील नागपाल, व्यंग्यचित्रकार मुकीम तांबोळी व मॉड्युलर किचन डिझाईन तज्ज्ञ भारत फाटक यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन असणार आहे."
या दोन दिवसांच्या समिटमध्ये विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजिली आहेत. ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) या क्षेत्राविषयी सरकारचा दृष्टीकोन यावर मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल्स कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित सोनी, 'एव्हीजीसी' व डिजिटल मीडिया क्षेत्रातील करिअरच्या संधींवर 'असिफा इंडिया'चे अध्यक्ष संजय खिमसेरा, ऑस्ट्रेलिया येथील किरुथीका अय्यर लेयर आपले विचार मांडणार आहेत.
'ब्रह्मास्त्र' सिनेमावर अनिमेशन व व्हीएफएक्स तज्ज्ञ जिगेश गज्जर यांचे विशेष सत्र होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
0 Comments