आफ्रिकन देशांना ‘वनराई बंधाऱ्या’ची भुरळ

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाणी परिषदेत ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया सहभागी


पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने अमेरिकेमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेमध्ये ‘वनराई’ संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया आमंत्रित प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.

‘ग्रामीण भारतातील स्वयंसेवी संस्थांच्या महासंघा’चे (CNRI) कार्यकारी सहअध्यक्ष या नात्याने त्यांनी त्याठिकाणी भारतातील सात हजार स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधित्व केले. ‘जागतिक जल दिना’निमित्त तीन दिवसीय या आंतरराष्ट्रीय जल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

जल संवर्धनाविषयी सर्व स्तरांवर जागरुकता निर्माण करणे, तसेच पाणी व स्वच्छताविषयक समस्यांवर उपाय योजण्यासाठी कृती-कार्यक्रम आखून त्याचा प्रचार-प्रसार करणे हा या जल परिषदेचा उद्देश होता.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘शाश्वत विकास’विषयक ६व्या उद्दिष्टात सुचवल्याप्रमाणे सन २०३० पर्यंत ‘सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे’ आवश्यक आहे.

मात्र, या उद्दिष्टापासून आज आपण कोसो दूर आहोत. म्हणूनच पाणी आणि स्वच्छताविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने ‘बदल’ घडवून आणण्याचे उद्दिष्ट यावर्षीच्या जल परिषदेतून बाळगण्यात आले.

या जल परिषदेमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशांच्या सरकारांचे आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते, जलतज्ञ व शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. जल-मृदा संवर्धनातून भारतीय खेड्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी सुमारे ४० वर्षांपासून वनराई संस्था कार्यरत असल्याने या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाकडून यावर्षी ‘वनराई’ संस्थेलासुद्धा आमंत्रित करण्यात आले होते.

या जल परिषदेविषयी माहिती देताना रवींद्र धारिया म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाची जल परिषद दि. २२ ते २४ मार्च २०२३ दरम्यान न्यूयॉर्कमध्ये झाली. या परिषदेमध्ये भावी जलसंकट आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांवर प्रामुख्याने चर्चा झाली.

शिवाय विकसनशील देशांमध्ये वारंवार पडणारे दुष्काळ, पाणी टंचाईची समस्या, हवामान बदलाचे आव्हान आणि या सर्व बाबींचा सामाजिक-आर्थिक विकासाशी असलेला संबंध याकडे जागतिक तज्ञांनी सर्वांचे लक्ष वेधले.

या परिषदेच्या निमित्ताने जलसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये ‘वनराई’ने राबवलेले विविध अभिनव प्रयोग जगभरातील तज्ञ मान्यवरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला मिळाली. यापैकी ‘वनराई बंधाऱ्या’ची संकल्पना आफ्रिकन देशांतील सहभागींना अतिशय आवडली.

त्यांनी त्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी उत्सुकतेने विचारणा केली आणि वनराई बंधाऱ्याचे सहज-सोपे, अल्पखर्ची तंत्र बारकाईने समजून घेतले. अशा प्रकारे पाण्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जगभरातल्या लोकांच्या गाठी-भेटी होणे आणि त्यांच्यामध्ये विचारांची, अनुभवांची आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण होणे हा सर्वच सहभागींसाठी एक अद्भुत आणि समृद्ध करणारा अनुभव होता.

भारतभूमीला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनवण्याचे ‘वनराई’चे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी या आंतरराष्ट्रीय विचारमंथनाचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल. ‘वनराई’चे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा आदरणीय अण्णांच्या या स्वप्नपूर्तीसाठी आज हजारो कार्यकर्ते आणि स्वयंसेवक तळागाळात झोकून देऊन काम करत आहेत. माझ्यासह वनराई परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी ही अतिशय समाधानकारक बाब आहे.

Post a Comment

0 Comments